संबंधित अहवाल बाल कल्याण विभागाकडून राज्यशासनाला सादर !
पुणे – कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला ३०० शब्दांचा निबंध, तसेच वाहतूक पोलिसांसमवेत १५ दिवस काम करण्याच्या अटी, शर्तीवर जामीन संमत केला होता. या विरोधात बाल न्याय मंडळातील २ अशासकीय सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी महिला आणि बाल कल्याण आयुक्तांनी केली आहे. सदस्यांनी दिलेल्या निर्णयाची चौकशी करण्यासाठी महिला आणि बाल कल्याण विभागाकडून समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने १०० हून अधिक पानांचा अहवाल बाल कल्याण विभागाकडे नुकताच सादर केला. मुलाला जामीन संमत करण्याच्या प्रक्रियेत सदस्यांनी पुष्कळ चुका केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. संबंधित अहवाल राज्यशासनाकडे सादर करण्यात आला. कल्याणीनगर भागात १९ मेच्या मध्यरात्री अपघात होऊन भरधाव मोटारीच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या मुलाला कह्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्हा नोंद झाल्यानंतर १५ घंट्यांत मुलाला बाल न्याय मंडळाने जामीन संमत केला होता.