उद्या २१ जुलै २०२४ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. त्या निमित्ताने…
‘भारतीय संस्कृतीमध्ये श्री गुरु आणि श्री गुरूंची परंपरा यांना पुष्कळ महत्त्व आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवलेरूपी गुरूंची महती वर्णावी तेवढी अल्पच आहे; तरीही माझ्या अल्पशा बुद्धीला जे उमजले, ते मी श्री गुरुचरणी अर्पण करत आहे. १९ जुलै या दिवशी या लेखातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/815552.html
१५. मार्गदर्शक गुरु
जे गुरु शिष्याची आवश्यकता जाणून विविध रूपे घेऊन किंवा विविध प्रसंगांमध्ये त्याला पदोपदी मार्गदर्शन करत असतात, त्यांना ‘मार्गदर्शक गुरु’, असे म्हणतात. अनेकदा एखाद्या शिष्याच्या जीवनात त्याला एकापेक्षा अधिक संत किंवा गुरु यांचे दर्शन आणि मार्गदर्शन लाभते. यांतील सर्वच संत किंवा गुरु त्याचे मोक्षगुरु न होता ते त्या शिष्याला केवळ विशिष्ट विद्या किंवा ज्ञान देण्यासाठी त्याच्या जीवनात आलेले असतात. त्यामुळे त्यांना ‘मार्गदर्शक गुरु’ असे संबोधले आहे.
उदा. १ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सिंधुदुर्ग येथील संत प.पू. भाऊ मसूरकर यांनी संख्याशास्त्र, प.पू. व्हटकर महाराज यांच्याकडून विविध प्रकारच्या मुद्रा, प.पू. डबरालवालेबाबा यांच्याकडून अनिष्ट शक्तींचे त्रास आणि त्यांवरील उपाय अशा विविध विषयांच्या संदर्भात मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे प.पू. भक्तराज महाराज हे ‘मोक्षगुरु’ असून त्यांच्या जीवनात आलेले विविध संत हे त्यांचे ‘मार्गदर्शक गुरु’ होते.
१६. समष्टी गुरु
जे गुरु शिष्यांना केवळ व्यष्टी स्तरावर मोक्षप्राप्तीसाठीच नव्हे, तर समाजात जाऊन धर्म आणि अध्यात्म यांचा प्रसार करून समाजात सुराज्य नांदण्यासाठी मार्गदर्शन करतात, त्यांना ‘समष्टी गुरु’ म्हणतात. ‘समष्टी गुरु’ या शब्दाचा अर्थच ‘समष्टीचे कल्याण करणारे’ असा आहे, उदा. दत्तावतारी संत श्रीपाद श्रीवल्लभ, स्वामी नृसिंहसरस्वती, स्वामी समर्थ, गुळवणी महाराज इत्यादी संतांनी अनेक ठिकाणी भ्रमण करून पतितांचा उद्धार केला, तसेच अनेकांची अनिष्ट शक्तींच्या त्रासातून मुक्तता केली आणि अनेक जणांचे प्रारब्धभोग सुसह्य करून त्यांना मुक्ती दिली.
१७. सद्गुरु
जे अखंड सच्चिदानंद अवस्था अनुभवत असतात त्यांना ‘सद्गुरु’ म्हणतात.
सद्गुरु केवळ जिज्ञासू, मुमुक्षू, साधक आणि शिष्य यांनाच नव्हे, तर संतांनाही साधनेच्या संदर्भात व्यष्टी अन् समष्टी अशा दोन्ही स्तरांवर मार्गदर्शन करत असतात. उदा. वैष्णवपंथी सद्गुरु रामानंदाचार्य यांनी संत कबीर, संत रईदास, संत पीपाजी यांसारख्या अनेक संतांना मार्गदर्शन करून त्यांना संतपदाच्याही पुढे नेले.
१८. परात्पर गुरु
परात्पर गुरुपदावर विराजमान असणारे गुरु हे विश्वकल्याणासाठी अखंड झटत असतात. त्यामुळे त्यांना ‘परमहंस गुरु’ असेही संबोधतात. उदा. योगी अरविंद हे परात्पर गुरु होते. त्यामुळे जेव्हा हिटलरने दुसर्या महायुद्धाच्या वेळी भारतावर आक्रमण करण्याचा निर्धार केला, तेव्हा योगी अरविंदांनी हिटलरमधील अनिष्ट शक्तीशी सूक्ष्मातून युद्ध करून तिला पराभूत करून नष्ट केले. त्यामुळे भारताचे हिटलरच्या आक्रमणापासून रक्षण झाले. (संदर्भ : ‘सर्च फॉर लाईट’ संकेतस्थळ )
१९. मोक्षगुरु
ज्याप्रमाणे एखादा बद्ध (बंदिस्त) व्यक्ती दुसर्या बद्ध व्यक्तीला मुक्त करू शकत नाही, त्याप्रमाणे ज्याने मोक्ष मिळवला नसेल, तो इतरांना मोक्षप्राप्तीसाठी मार्गदर्शन करू शकत नाही. याचा अर्थ ज्याने स्वत: मोक्षप्राप्ती केलेली असते, तोच इतरांना मोक्ष देऊ शकतो. अशा आध्यात्मिक अधिकारी व्यक्तीला ‘मोक्षगुरु’ असे आदराने संबोधले जाते. उदा. ‘सांदिपनी ऋषींनी त्यांचे शिष्य अरुणी, संदीपक आणि उपमन्यू यांची कठोर परीक्षा घेऊन त्यांना आत्मज्ञान देऊन त्यांना मोक्षाला नेले’, असा गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे. राजा परीक्षिताने शृंगी ऋषींच्या पित्याचा अपमान केल्यामुळे त्याला शृंगीऋषी शाप देतात की, ‘सात दिवसांनी तक्षक नागाचा दंश होऊन मृत्यू होईल.’ महर्षी व्यासांचे पुत्र शुकदेव हे राजा परीक्षिताचे ‘मोक्षगुरु’ होते. त्यामुळे श्रवणभक्तीचे मूर्तीमंत स्वरूप असणार्या परीक्षित राजाला परमज्ञानी शुकदेवांकडून सलग सात दिवस श्रीमद्भागवताचे ज्ञान प्राप्त झाले आणि ७ व्या दिवशी परीक्षित राजाला सर्पदंश होऊन त्याचा मृत्यू झाल्यावर त्याला मोक्ष प्राप्त होतो.
२०. अवतारीगुरु
जेव्हा भगवंताचे देवतारूपी तत्त्व पृथ्वीवर अवतीर्ण होऊन समाजाच्या कल्याणासाठी किंवा धर्मसंस्थापना करण्याकरता कार्यरत होते, तेव्हा त्या गुरूंना ‘अवतारीगुरु’ असे संबोधले जाते.
२० अ. व्यष्टी अवतारी गुरु : संत तुलसीदास हे हनुमानतत्त्व असलेल्या वाल्मीकि ऋषींचे अवतार होते. त्यामुळे वाल्मीकि ऋषींनी त्रेतायुगात ‘रामायण’ आणि कलियुगात संत तुलसीदासांच्या रूपाने ‘रामचरितमानस’ हा ग्रंथ लिहिला. राधेचा अवतार असलेले नवद्वीपातील संत चैतन्य महाप्रभु यांनी कृष्णभक्तीचा प्रसार करून अनेक जिवांचा उद्धार केला. श्रीविष्णूचे अंशावतार असणारे संत स्वामी नारायण यांनीही भगवद्भक्तीचा प्रसार करून समाजजीवन सुखी केले आणि अनेक पतितांचा उद्धार केला.
२० आ. समष्टी अवतारी गुरु : महाराष्ट्रातील रयतेला स्वराज्य आणि सुराज्य यांचे सुख उपभोगता यावे, यासाठी समर्थ रामदासस्वामींनी त्यांचे परमशिष्य छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘क्षात्रधर्म’ आणि ‘राजधर्म’ यांचे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. असेच मार्गदर्शन आर्य चाणक्य यांनी चंद्रगुप्त मौर्य याला करून भारतात विभाजित झालेल्या विविध राज्यांचे संघटन करून भारतात एकछत्र असलेल्या हिंदु राष्ट्राची स्थापना केली होती. त्याचप्रमाणे विद्यारण्यस्वामींनी हरिहर आणि बुक्कराय यांना मार्गदर्शन करून दक्षिण भारतात ‘विजयनगर साम्राज्यरूपी हिंदु राष्ट्राची’ स्थापना केली होती.
२१. गुरुतत्त्वाच्या सर्व गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणारे ‘परम गुरु’ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
हिंदु राष्ट्राचे प्रणेते आणि अध्वर्यु (‘अर्ध्वर’ म्हणजे यज्ञ. ‘अध्वर्यु’, म्हणजे यज्ञ करणारा प्रमुख ऋत्विज (म्हणजे पुरोहित)) सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामध्ये आतापर्यंत उल्लेख केलेल्या सर्व प्रकारच्या गुरूंची सर्व दैवी लक्षणे आढळतात. अशा प्रकारे परिपूर्ण गुरु असणारी विभूती, म्हणजे ‘परमगुरु’ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आहेत. त्यामुळे ते परिपूर्ण गुरुपदावर विराजमान आहेत. हे पद अध्यात्मातील सर्वाेच्च आणि परमोच्च स्तराचे पद आहे. या पदावर केवळ सर्व गुरूंची गुणवैशिष्ट्ये आणि श्रीराम अन् श्रीकृष्ण यांच्याप्रमाणे परिपूर्ण अवतारी तत्त्व असलेले गुरुच विराजमान होऊ शकतात.
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)(आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.४.२०२३) (समाप्त)
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. |