भारतीय परंपरेतील श्री गुरूंची विविध रूपे, त्यांचे आध्यात्मिक महत्त्व आणि गुरुतत्त्वाच्या सर्व गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणारे ‘परम गुरु’ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

२१ जुलै २०२४ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘भारतीय संस्कृतीमध्ये श्री गुरु आणि श्री गुरूंची परंपरा यांना पुष्कळ महत्त्व आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत  आठवलेरूपी गुरूंची महती वर्णावी तेवढी अल्पच आहे, तरीही माझ्या अल्पशा बुद्धीला जे उमजले, ते मी श्री गुरुचरणी अर्पण करत आहे. १८ जुलै या दिवशी या लेखातील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी  येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/815292.html

११. भक्तीगुरु

ज्या गुरूंच्या प्रेरणेमुळे जिवामध्ये भक्ती जागृत होऊन त्याचा उद्धार होतो त्यांना ‘भक्तीगुरु’ म्हणतात, उदा. श्रीकृष्णाच्या परम भक्त उद्धवाला त्याच्या ब्रह्मज्ञानाचा अहंकार झालेला असतो. त्यामुळे तो भक्तीमार्गी असणार्‍या गोपींना हीन लेखत असतो. त्याचा हा अहंकार नष्ट करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्याला मथुरेहून वृंदावनात रहाणार्‍या त्याच्या परम भक्त गोपी आणि राधा यांच्याकडे जाण्यासाठी सांगतो. भगवान श्रीकृष्ण उद्धवासह स्वत:च्या हाताने लिहिलेले पत्र गोपींना देण्यास सांगतो. त्याप्रमाणे उद्धव श्रीकृष्णाचे पत्र घेऊन वृंदावनात जातो. तेथे श्रीकृष्णाचे पत्र पाहून प्रत्येक गोपी पत्र घेण्यासाठी ते ओढते आणि ते पत्र फाटून त्याचे तुकडे तुकडे होतात. तेव्हा उद्धवाला गोपींचा पुष्कळ राग येतो. तेव्हा त्याची भेट श्रीकृष्णाची परम प्रिय भक्त राधेशी होते. उद्धवाला राधेसमवेत श्रीकृष्णाचे दर्शन होते. तेव्हा उद्धवाला आश्चर्य होऊन तो राधेला शरण जातो. त्यानंतर राधा त्याला भक्तीमार्गाचे महत्त्व सांगून आत्मज्ञान देते. त्यामुळे उद्धवाचा ज्ञानाचा अहंकार नष्ट होऊन तो श्रीकृष्णाच्या भक्तीत लीन होतो. या प्रसंगात राधेमुळे उद्धवात भक्ती जागृत झाली. त्यामुळे राधा त्याची ‘भक्तीगुरु’ असते.

१२. ज्ञानगुरु

सुश्री (कु.) मधुरा भोसले

जे गुरु शिष्याला आत्मज्ञान देऊन त्यांचा उद्धार करतात त्यांना ‘ज्ञानगुरु’ असे संबोधले जाते. संत मीराबाईंना संत रईदास (संत मीराबाईचे गुरु आणि उत्तर भारतातील प्रसिद्ध संत) यांच्याकडून आत्मज्ञान मिळाले होते, उदा. संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई यांना संत निवृत्तीनाथांकडून ज्ञान मिळाले होते. जेव्हा संत नामदेवांना त्यांच्या विठ्ठलभक्तीचा अहंकार झाला होता, तेव्हा संत विसोबा खेचर यांनी त्यांना आत्मज्ञान देऊन त्यांचे गर्वहरण केले होते. त्याचप्रमाणे जेव्हा सनकादीऋषींना ज्ञानाचा अहंकार झाला होता, तेव्हा शिवाने दक्षिण दिशेला मुख करून आसनस्थ होऊन सनकादीऋषींना (सनक (प्राचीन), सनातन (शाश्वत), सानंदन (सतत आनंद असणारे) आणि सनत (चिरतरूण असणारे) आत्मज्ञान देऊन त्यांचा अहंकार नष्ट केला. त्यामुळे शिवाचे हे ज्ञानगुरूंचे रूप ‘दक्षिणामूर्ती’ या नावाने विख्यात झाले.

१३. मुक्तीगुरु किंवा उद्धारकगुरु

ज्या गुरूंनी दिलेल्या ज्ञानामुळे किंवा ज्या गुरूंच्या कृपेमुळे एखाद्या जिवाला मुक्ती मिळून त्याचा उद्धार होतो, तेव्हा त्या गुरूंना ‘मुक्तीगुरु’ किंवा ‘उद्धारकगुरु’ असे म्हणतात, उदा. दरोडेखोर असणार्‍या वाल्या कोळ्याचा उद्धार होण्यासाठी नारदमुनींनी त्याला रामनामाचा जप करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे जेव्हा वाल्या कोळी सहस्रो वर्षे रामनामाचा जप करतो, तेव्हा प्रभु श्रीराम तेथे प्रकट होऊन त्याचा उद्धार करतात. त्यामुळे वाल्या कोळ्याची पापातून मुक्ती होऊन त्याचे रूपांतर वाल्मिकीऋषीमध्ये होते. अशा प्रकारे नारदमुनी हे वाल्या कोळ्याचे ‘मुक्तीगुरु किंवा उद्धारकगुरु’ होते, उदा. इंद्राने अहिल्येचे शील भंग केल्यामुळे अहिल्येचे पती गौतमऋषी यांनी तिला ‘शिळा होऊन पडशील’, असा शाप आणि ‘तुझा उद्धार प्रभु श्रीराम करील’, असा उ:शाप दिला. त्याप्रमाणे जेव्हा अहिल्या शिळा होऊन पडलेली होती, तेव्हा ती अखंड रामनामाचा जप करत होती. त्यानंतर कैक वर्षांनी त्राटिकेचा वध करून प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण विश्वामित्रऋषींसमवेत गौतमाश्रमात आले. जेव्हा विश्वामित्रऋषींच्या आज्ञेने प्रभु श्रीरामाने शिळेला चरण स्पर्श केला, तेव्हा त्या शिळेचे रूपांतर अहिल्येत होऊन तिला जडयोनीतून मुक्ती मिळाली. अशा प्रकारे गौतमऋषी आणि विश्वामित्रऋषी हे अहिल्येचे ‘मुक्तीगुरु किंवा उद्धारक गुरु’ होते आणि प्रभु श्रीराम हे साक्षात् ‘मुक्तीदाता’ होते.

 १४. आत्मगुरु

‘मम हृदयी कोण हे भासे । गुरुकृपेविण ना गवसे गुरुवरा ।।’

– प.पू. भक्तराज महाराज (संत भक्तराज महाराज विरचित भजनामृत) (भजन क्र. ७९ : मम हृदयी कोण हे भासे ।

अर्थ : या ओळींचा अर्थ आहे, जेव्हा श्री गुरूंची कृपा होते, तेव्हा कृपेमुळे जिवावरील मायारूपी अविद्येचे आवरण निघून जाते आणि तेव्हाच जिवातील आत्मा प्रगट होऊन त्याला आतून मार्गदर्शन करू लागतो. यालाच ‘आंतरिक गुरु’ किंवा ‘आत्मगुरु’ म्हणतात, उदा. जेव्हा स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांना अध्यात्माच्या संदर्भात विविध प्रकारचे प्रश्न विचारायचे, तेव्हा रामकृष्ण परमहंस त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांना मार्गदर्शन करायचे. त्यानंतर त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या जिज्ञासू आणि विवेकशील प्रतिभेवर प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला की, ‘यापुढे तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुला आतून मिळेल. मीच तुझ्यातील आत्मा बनून तुला पदोपदी मार्गदर्शन करीन.’ अशा प्रकारे श्री गुरूंचे मूर्तीमंत स्वरूप असणार्‍या रामकृष्ण परमहंस यांच्या कृपेमुळे स्वामी विवेकानंदांना ‘आत्मगुरु’ लाभले. वर्ष १८९३ मध्ये आत्मगुरूंनी केलेल्या मार्गदर्शनानुसार ‘शिकागो’ येथे आयोजित केलेल्या सर्वधर्मसभेत जाऊन स्वामी विवेकानंदांनी हिंदु धर्माचे महत्त्व जगाला सांगून जगात हिंदु धर्माची पताका जगभर  फडकावली.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)(आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.४.२०२३)        (क्रमश:)

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.