प्रवासाची माहिती देणारे व्हिडिओ बनवणार्‍या अन्वी कामदारचा ‘रिल’ बनवतांना ३०० फूट दरीत कोसळून मृत्यू

अन्वी कामदार (संग्रहित चित्र)

पनवेल – व्यवसायाने लेखा परीक्षक (सीए) असलेली मुंबईची अन्वी कामदार ‘इन्स्टाग्राम’वर ‘ट्रॅव्हल ब्लॉगर’ (प्रवासाची माहिती देणारी) म्हणून प्रसिद्ध आहे. कुंभे धबधब्याच्या कड्यावर इन्स्टाग्रामसाठी ‘रिल’ (३० सेकंदाचा व्हिडिओ) बनवत असतांना अन्वीचा तोल गेला आणि ती ३०० फूट खोल दरीत कोसळली.

दरीत कोसळल्यानंतर तिच्या सहकार्‍याने तातडीने याची माहिती माणगाव पोलीस ठाण्यात कळवली. कोलाड, माणगाव, महाड येथून प्रशिक्षित बचाव पथकांना पाचारण करण्यात आले. दोरीच्या साहाय्याने बचाव पथके दरीत उतरली. या वेळी अन्वी गंभीर घायाळ अवस्थेत असल्याचे दिसून आले. तिला स्ट्रेचरच्या साहाय्याने दोरीने ओढून वर काढण्यात आले; मात्र माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला.

तिच्या इन्स्टाग्राम खात्याला अडीच लाखांहून अधिक अनुयायी (फॉलोअर्स) आहेत.  अन्वी कामदारने जगभर फिरून प्रवासाचे अनेक व्हिडिओ सिद्ध केले होते. पर्यटकांना चांगली स्थळे, हॉटेल्स आणि समुद्रकिनारे दाखवण्यासाठी ती ‘रिल्स’ बनवत असे.

संपादकीय भूमिका :

प्रसिद्धी आणि पैसा यांच्या हव्यासापोटी धोकादायक ठिकाणी ‘रिल्स’ करणार्‍यांवर कारवाई झाल्यासच अशा प्रकारांना आळा बसेल !