नवी मुंबई – ‘जम्मू कश्मिर डोगरा समाज ट्रस्ट’च्या वतीने वाशी येथे ‘कारगिल विजय दिवस’ कार्यक्रमाचे २८ जुलै या दिवशी आयोजन करण्यात आले आहे. येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात रात्री ८ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून मेजर जनरल जी.डी. बक्शी (निवृत्त), कर्नल अमरजित सिंह वाधवान (निवृत्त) हे उपस्थित असणार आहेत, अशी माहिती ‘जम्मू कश्मिर डोगरा समाज ट्रस्ट’चे अध्यक्ष कृष्णा पंडित यांनी दिली.
भारत-पाकिस्तान मध्ये वर्ष १९९९ मध्ये झालेल्या युद्धात भारतीय सैन्याने दुर्गम भागात जाऊन पाकिस्तानी सैन्याला नामोहरम केले होते. या युद्धात धारातिर्थी पडलेल्या हुतात्म्यांच्या सन्मामार्थ प्रतिवर्षी २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा २५ वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवसाचे औचित्य साधत जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या शौर्याला नमन केले जाते.
जम्मू-काश्मीरमधील कारगिलमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये चालू झालेल्या या युद्धाला २ दशकांहून अधिक काळ लोटला आहे. देशाच्या या वीरांची कहाणी सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही ‘जम्मू कश्मीर डोगरा समाज, मुंबई’ यांच्या वतीने कारगिल विजय दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कारगिल युद्धातील वीरांच्या शौर्याला श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. यानिमित्त ज्यांनी ‘ऑपरेशन विजय’चे नेतृत्व केले आणि भारतीय सशस्त्र दलांना विजय मिळवून दिला अशांकडून कारगिल युद्धावर प्रकाश टाकणारी १० विशेष तथ्ये जाणून घ्याण्यासाठी सर्र्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.