महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण
ठाणे – स्वतःवर नोंद झालेला विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पीडित महिला रिदा रशीद हिच्याविरुद्ध षड्यंत्र रचले होते. या खोट्या गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या २ अधिवक्त्यांसह कटात सहभागी झालेल्या २३ आरोपींच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणातील आव्हाड यांची हस्तक मुंब्रा येथील इस्टेट एजंट शबाना सोंधी (वय ४० वर्षे) हिला पोलिसांनी अटक केली असून ‘आव्हाड आणि अन्य आरोपी मात्र मोकाट असून त्यांच्यावर तातडीने अटकेची कारवाई करावी’, अशी मागणी ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पीडित महिला रिदा रशीद यांनी केली आहे.
१. मुंब्रा जंक्शन येथील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नोव्हेंबर २०२२ मध्ये पार पडला. तेव्हा आव्हाडांनी दोन्ही हातांनी पकडून बाजूला हटवल्यामुळे भाजप महिला मोर्चाच्या ठाणे उपाध्यक्षा रिदा रशीद यांनी आव्हाडांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दिली होती. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला; पण संतप्त आव्हाड यांनी जुनी घटना उकरून काढत रिदा रशीद यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवला. यात पुरावा सापडला नाही.
२. पुन्हा आव्हाड यांनी समथर्कांसह रिदा राशीद यांच्याविरुद्ध तक्रार केल्याने मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला; मात्र अन्वेषणाअंती तोही गुन्हा निष्पन्न झाला नाही. शेवटी ठाणे सत्र न्यायालयाने खोट्या गुन्ह्यातील तक्रारदार आणि साक्षीदार यांच्यावरच गुन्हे नोंदवण्याचे निर्देश दिले.
३. रौनक आजम शेख, शबाना शेख, शाहिस्ता कुरेशी, सिमरन सोधी, शिवा जगताप, जितेंद्र सतीश आव्हाड आणि त्यांचे इतर साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायालयाने पोलीस उपायुक्तांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.