छत्रपती शिवरायांची वाघनखे सातार्‍यात पोचली !

प्रतिकात्मक चित्र

सातारा – छत्रपती शिवरायांची वाघनखे लंडन येथील संग्रहालयातून सातारा येथे पोचली आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली असून सातार्‍यातील संग्रहालयात पुढील १० महिने ही वाघनखे इतिहासप्रेमींसह सर्व नागरिकांना पहाता येणार आहेत. पोलीस बंदोबस्तात ही नखे सातार्‍यात आली असून १९ जुलैपासून नागरिकांना पहाता येतील. १९ जुलैला सकाळी ११ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाघनखे आणि शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. वाघनखांच्या आगमनाचा भव्य सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

सातार्‍यानंतर राज्यातील अन्य शासकीय वस्तूसंग्रहालयांमध्ये ही वाघनखे ठेवण्यात येणार आहेत. ३ वर्षांनी ही वाघनखे पुन्हा ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’मध्ये पाठवण्यात येणार आहेत. (शासनाने ही ऐतिहासिक वाघनखे कायमस्वरूपी भारतात रहाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका :

छत्रपती शिवाजी महाराज यांनी याच वाघनखांद्वारे अफझलखानाचा कोथळा  बाहेर काढून ‘आतंकवाद असाच संपवावा लागतो’, हे दाखवून दिले होते. त्यामुळे अफझलखानवधाच्या चित्रावर बंदी आणण्याची मागणी करणार्‍यांनी आता या वाघनखांच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !