जळगाव येथील पाचोरा आणि भडगाव येथे आषाढी एकादशीला मांसविक्री बंद ठेवा !

भाजप वैद्यकीय आघाडीकडून मागणी !

प्रांताधिकार्‍यांना निवेदन देतांना (डावीकडून तिसरे) डॉ. नीलकंठ पाटील

पाचोरा (जिल्हा जळगाव) – राज्यात १७ जुलै या दिवशी आषाढी एकदशीनिमित्त भावभक्तीचे वातावरण असते. सर्वत्र वारकरी समाज, तसेच हिंदु समाज या दिवशी उपवास, उपासना करतो. गावागावांत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अशा पवित्र दिनी पाचोरा आणि भडगाव तालुक्यांत एक दिवस मांसविक्री प्रतिबंधित करण्यात यावी, अशी मागणी भाजप उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी डॉ. नीळकंठ पाटील यांनी प्रांताधिकार्‍यांकडे केली. (हिंदुबहुल देशात अशी मागणी का करावी लागते ? – संपादक) आषाढी एकादशी या धार्मिक दिवशी आपल्या गावात एक दिवसासाठी मांसविक्री बंद केल्यामुळे वारकर्‍यांच्या आणि गावातील हिंदु समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर राखला जाईल. आषाढी एकादशीला एक दिवसासाठी मांसविक्री बंदी, हीच आपल्या लाडक्या विठुमाउलीला आपल्या प्रशासनाकडून सात्त्विक भेट ठरेल, असे या निवेदनात म्हटले आहे.