गौरी लंकेश हत्या प्रकरण
बेंगळुरू (कर्नाटक) – पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमित डेगवेकर, सुरेश एच्.एल्. आणि के.टी. नवीन कुमार या तिघांना कर्नाटक उच्च न्यायालयाने १६ जुलै २०२४ या दिवशी जामीन संमत केला. या संशयित आरोपींना कर्नाटक उच्च न्यायालयाच्या कलबुर्गी खंडपिठाचे न्यायमूर्ती एस्. विश्वजित शेट्टी यांनी जामीन संमत केला. संशयित आरोपींच्या वतीने अधिवक्ता अरुण श्याम, अधिवक्ता मधुकर देशपांडे, अधिवक्ता बसवराज सप्पण्णवर, अधिवक्ता उमाशंकर मेगुंडी, अधिवक्त्या दिव्या बाळेहित्तल आणि अधिवक्ता निशांत कुशलप्पा यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली.
१. ‘या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी मोहन नायक यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने यापूर्वी जामीन संमत केला आहे. हे लक्षात घेऊन आम्हालाही जामीन द्यावा’, अशी मागणी वरील संशयित आरोपींनी केली होती.
२. या प्रकरणातील संशयित आरोपी मोहन नायक यांना उच्च न्यायालयाने डिसेंबर २०२३ मध्ये जामीन संमत केला होता. त्यांना न्यायालयाच्या खटल्याच्या सुनावणीमध्ये होणार्या विलंबामुळे जामीन देण्यात आला होता. ‘दोषारोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या ५२७ साक्षीदारांपैकी केवळ ९० साक्षीदार तपासण्यात आले होते’, असा युक्तीवाद मोहन नायक यांच्या अधिवक्त्यांनी केला होता.
३. सरकारी अधिवक्त्यांनी या तिघांच्या जामीन आवेदनावर आक्षेप घेतला. ‘कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपिठाने एम्.एम्. कलबुर्गी हत्येच्या प्रकरणात या तिघांचा जामीन अर्ज नाकारला आहे. त्यामुळे या तिघांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा’, असे सरकारी अधिवक्त्यांनी जामीन आवेदनावर आक्षेप घेतांना म्हटले होते.