मुंबई, १६ जुलै (वार्ता.) – विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात राज्यात ‘महावाचन उत्सव २०२४’ राबवण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या इयत्ता ३ री ते १२ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.
हा उपक्रम राबवण्यासाठी इयत्ता ३ री ते ५ वी, इयत्ता ६ वी ते ८ वी आणि इयत्ता ९ वी ते १२ वी अशी वर्गवारी निश्चित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीसाठी प्रोत्साहित करणे, अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे, मराठी साहित्याशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास, संवाद कौशल्याचा विकास आदी उद्देश ठेवून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
असा राबवणार उपक्रम !
१. उपक्रमासाठी वेब पोर्टलची निर्मिती करून त्यामध्ये शाळांची नोंदणी करायची आहे. विद्यार्थ्यांना कथा, कादंबर्या, आत्मचरित्रे आदी विविध साहित्य उपलब्ध करून द्यायचे आहे.
२. वाचन केलेल्या पुस्तकावर चिंतन करून १५०-२०० शब्दांमध्ये हे विचार ‘महावाचन उत्सव’च्या पोर्टलवर अपलोड करायचे आहेत.
३. पुस्तकाचा सारांश व्हिडिओ किंवा ऑडिओ यांद्वारे पोर्टलवर अपलोड करायचा आहे. यामध्ये जिल्हा आणि तालुका स्तरांवर पहिल्या ३ क्रमांकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.