सातत्याने सेवा करणार्‍या कै. (श्रीमती) आदिती देवल !

१. पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात येऊन रहाणे

श्रीमती अदिती देवल

‘श्रीमती देवलकाकू मूळच्या सांगली जिल्ह्यातील होत्या. त्यांनी त्यांचे सांगलीतील घर विकले आणि पूर्णवेळ साधना करण्यासाठी त्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात येऊन राहू लागल्या. साधनेसाठी त्यांनी बर्‍याच गोष्टींचा त्याग केला होता.

२. तळमळीने संकलन सेवा करणे

सौ. कविता बेलसरे

देवलकाकूंनी उतारवयात संकलन करण्याची सेवा शिकून घेतली. सेवेतील चुका लक्षात घेऊन त्या तळमळीने सुधारणा करत असत. लक्षात न आलेली सूत्रे त्या परत परत विचारून घेत. खरेतर काकूंना नीट ऐकू येत नसे; परंतु त्या समस्येचा त्यांनी सेवेत कधी अडथळा येऊ दिला नाही.

३. इतरांचा विचार करणे

मी संकलन सेवा शिकण्यासाठी रामनाथी, गोवा येथील आश्रमात काही दिवस राहिले होते. त्या कालावधीत मला रात्री झोप लागायची नाही. याविषयी मी देवलकाकूंना सांगितल्यावर त्यांनी लगेच मला नामजपादी उपायांचा कालावधी वाढवण्यास सांगितले, तसेच निद्रा येण्यासाठी मुद्रा करून नामजप करत झोपण्यास सांगितले.

‘देवलकाकूंकडून शिकता आलेली सूत्रे मला आचरणात आणता येऊ देत’, अशी श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना !’

– सौ. कविता बेलसरे, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग. (१०.७.२०२४)