शांत, हसतमुख आणि जीवनात ‘आश्रम अन् गुरुसेवा’ यांना सर्वाधिक महत्त्व देणार्‍या कै. (श्रीमती) आदिती देवल !

‘मी २ – ३ वर्षे श्रीमती देवलकाकूंच्या समवेत रामनाथी, गोवा येथील आश्रमातील ग्रंथ विभागात सेवा केली. त्या वेळी मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्रीमती अदिती देवल

१. शांत आणि हसतमुख

श्रीमती देवलकाकू अत्यंत शांत आणि प्रेमळ होत्या. त्यांचा चेहरा नेहमी हसतमुख असायचा.

सौ. देवी कापडिया

२. अनासक्त वृत्तीमुळे मायेत न अडकणे

देवलकाकूंची घरची स्थिती अतिशय चांगली असूनही त्या आश्रमात अत्यंत साधेपणाने रहायच्या. त्यांना नातेवाईक, वस्तू किंवा बाहेरचे खाणे यांविषयी कोणतीच आसक्ती नव्हती. त्या शांत आणि समाधानी होत्या. त्या कुठल्याही मायेतील नात्यांत न अडकता सतत सेवेला प्राधान्य द्यायच्या आणि अन्य कुठे जाणेही टाळायच्या. त्यांच्यासाठी ‘आश्रम आणि गुरुसेवा’ हेच महत्त्वाचे होते.

३. सेवेची तळमळ देवलकाकू सतत सेवारत असायच्या.

अ. संकलनासाठी दिलेल्या धारिकेत त्यांना काही शंका असल्यास त्या तत्परतेने संबंधित साधकांना विचारून घेऊन व्यवस्थित समजून घ्यायच्या.

आ. त्यांच्याकडे साधकांना नामजपादी उपाय सांगण्याची सेवाही होती. ही सेवा त्या तत्परतेने आणि प्रेमाने करायच्या.

४. ‘काकू सतत देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे जाणवणे

देवलकाकूंशी बोलतांना त्या त्यांना शिकायला मिळालेल्या सूत्रांविषयी सांगायच्या आणि मलाही त्याविषयी विचारायच्या. ‘त्या सतत देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे जाणवायचे. त्यामुळे त्यांच्याशी बोलल्यावर शांत आणि आनंदी वाटायचे.’

– सौ. देवी कापडिया (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ७१ वर्षे), फोंडा, गोवा. (९.७.२०२४)