गुरुपौर्णिमेच्या सेवा करतांना आणि प्रत्यक्ष गुरुपौर्णिमेच्या दिवशी दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील साधकांना आलेल्या अनुभूती

१५ जुलै या दिवशी अनुभूतींचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.

 लेखाचा मागील वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/814421.html

५. श्री. प्रतीक टेमकर  

५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर मोगर्‍याची फुले अर्पण केली जातांना मोगर्‍याचा सुगंध येऊन तो आवडत नसतांना हवासा वाटणे : ‘१३.७.२०२२ या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळच्या सत्रात ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहातांना गुरुदेवांच्या चरणांवर मोगर्‍याची फुले अर्पण केली जात होती. तेव्हा शेवटपर्यंत मला मोगर्‍याच्या फुलांचा सुगंध येत होता. त्या सुगंधाने माझ्या मनाची मरगळ नष्ट होऊन मला उत्साह आणि चैतन्य जाणवू लागले. खरेतर, मला मोगर्‍याचा सुगंध फारसा आवडत नाही. एरव्ही मी तो सुगंध घेणेही टाळतो; पण आत्ता मला हा सुगंध हवाहवासा वाटत होता. मी तो दीर्घ श्वासाने शरिरात घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे ‘माझे मन, बुद्धी आणि शरीर पवित्र होईल’, असे मला वाटले.’

६. श्री. संतोष मांडवकर              

६ अ. गुरुपौर्णिमेच्या वेळी सहजतेने अर्पण मिळाल्यावर ‘अर्पण घेण्याची सेवा करायला स्वतःच न्यून पडतो’, याची जाणीव होणे : ‘या वर्षी गुरुपौर्णिमेची सेवा करतांना धावपळ न होता सहजतेने सेवा होऊन आनंद मिळाला. गुरुपौर्णिमेच्या प्रसादासाठी एका हितचिंतकाने सहजतेने १० किलो खडीसाखर आणि ५०० पिशव्या अर्पण दिल्या. तेव्हा ‘अर्पण घ्यायची सेवा करतांना मीच उणा पडतो’, असे मला राहून राहून जाणवत होते.

६ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम पहातांना भावजागृती होऊन पुष्कळ चैतन्य जाणवणे : ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदेवांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम ‘ऑनलाईन’  पहातांना भावजागृती होऊन बराच वेळ भाव टिकून राहिला होता. दोन दिवस भरपूर चैतन्य जाणवत होते.’

७. श्री. सूरज रवींद्र चव्हाण 

७ अ. ‘साधकांच्या पूर्वजांना गती मिळावी’, यासाठी गुरुदेवांनी दत्ताचे रूप धारण केले आहे’, असे जाणवणे : ‘९.७.२०२२ या दिवशी बालसंस्कारवर्गामधे गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगतांना ‘दत्तगुरूंनी आपल्या जीवनामध्ये २४ गुणगुरु केले’, याविषयी आपोआपच सांगितले गेले. त्या दिवसापासून अधूनमधून माझा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप होत होता. ‘प.पू. गुरुदेव म्हणजे साक्षात् ‘श्री गुरुदेव दत्तच आहेत’, असे मला जाणवत होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी परम पूज्यांचे ‘दत्तरूप’ (टीप) पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘परम पूज्य सभागृहात साक्षात् उपस्थित आहेत’, असे मला जाणवत होते. गुरुदेव साधकांची काळजी घेत आहेतच; परंतु ‘साधकांच्या पूर्वजांना सद्गती देण्यासाठी गुरुदेवांनी दत्तांचे रूप धारण केले आहे’, असे मला जाणवले. ’

(टीप – ‘१३.७.२०२२ या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने गुरुपौर्णिमेच्या निमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सर्व साधकांना एकमुखी  दत्तगुरूंच्या रूपात दर्शन दिले.’ – संकलक)

८. सौ. प्रियांका शरद पवार

८ अ. सेवेतून आनंद अनुभवता येणे

१. ‘शारीरिक त्रासामुळे गुरुपौर्णिमेच्या प्रचाराची सेवा करता येणार नाही’, अशी मला सतत खंत वाटत होती; पण गुरुकृपेमुळे एक चांगले नाडीतज्ञ वैद्य मिळाले आणि त्यांच्या उपचारांनी प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे शेवटच्या १५ दिवसांत खारीच्या वाट्याप्रमाणे सेवेचा आनंद घेता आला.

२. मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी वक्ते आणि संत यांच्या भोजन व्यवस्थेची सेवा मिळाली. सहसाधकांच्या साहाय्याने ती सेवा चांगली होऊन सेवेतून आनंद मिळाला.

८ आ. कार्यक्रम पहातांना मन निर्विचार होऊन आनंद अनुभवणे : गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी कार्यक्रम पहातांना गुरुमाऊलीच्या चरणांवर मानसरित्या फुले अर्पण करून १०८ वेळा मंत्र म्हणायचे होते. तेव्हा ‘मी फुलपाखराप्रमाणे गुरुमाऊलीच्या भोवती बागडत असून अतिशय आनंदात आहे’, असे अनुभवले. त्या वेळी माझे देहभान हरपले होते आणि मन निर्विचार झाले होते. ‘माझ्या आजूबाजूला काय चालले आहे’, याचे मला भान नव्हते. मी भानावर आले, तेव्हा मी पुष्कळ आनंदी होते. ‘हा आनंदाचा क्षण मला अनुभवायला दिला’, यासाठी मी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

९. सौ. पूजा सुधाकर गुरव 

९ अ. पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्येकाकू यांचा सन्मान करतांना भावजागृती होऊन ‘साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनाच पुष्पहार अर्पण करत आहे’, असे जाणवणे : ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्याकडे सनातनच्या ९४ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये यांच्या सन्मानाची सेवा होती. सन्मानाच्या वेळी पू. शेट्येकाकूंना पुष्पहार अर्पण करतांना ‘मी साक्षात् गुरुदेवांनाच पुष्पहार अर्पण करत आहे’, असे जाणवून माझी एकदम भावजागृती झाली. त्या भावातच मी पू. शेट्येकाकूंचा सन्मान केला. तेव्हा ‘मनामध्ये एक वेगळाच आनंद आणि उत्साह जाणवत होता. ‘माझ्यामधील चैतन्याचे प्रमाण वाढले’, असे मला जाणवले. माझ्याकडून गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली. तो संपूर्ण दिवस आणि गुरुपौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशीही भावजागृती पुष्कळ वेळ टिकून होती.’

१०. श्री. दिनेश कडव 

१० अ. वातावरणात गुलाब आणि धूप यांचा सुगंध पसरणे : गुरुपूजनाच्या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी गुरुदेवांना गुलाबांच्या फुलांचा हार घातला, तेव्हा वातावरणात गुलाबाचा सुगंध पसरला होता. धूप ओवाळला, तेव्हा धुपाचा गंध येत होता. ‘गुरुदेवांच्या कृपेमुळे हे सर्व मला अनुभवता आले’, यासाठी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

सर्व सूत्रांचा दिनांक (२८.८.२०२२)

(समाप्त)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक