गुरुपौर्णिमेच्या सेवा करतांना आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी दापोली (रत्नागिरी) येथील साधकांना आलेल्या अनुभूती 

१. कु. सिद्धि गुजराथी 

१ अ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘दत्तगुरूंचा नामजप करू नये’, असे वाटणे : ‘गुरुपौर्णिमेच्या सकाळच्या सत्रात ‘श्री दत्तगुरूंचा नामजप चालू असतांना मला पुष्कळ ग्लानी येत होती आणि नामजप करू नये, उठून बाहेर जाऊया’, असे वाटत होते.

१ आ. गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘ऑनलाईन’ रथोत्सव पहातांना ‘स्वतः त्यात सहभागी आहे’, असे जाणवणे : गुरुपौर्णिमेच्या सकाळच्या सत्रात ‘ऑनलाईन’ रथोत्सव पहातांना ‘मी स्वतः त्यात सहभागी आहे’, असे मला जाणवले. गुरुमाऊलीला सतत पहाण्याची आिण त्यांचे रूप हृदयात साठवून ठेवण्याची संधी मिळाली. नंतर मधेमधे रथोत्सव आठवून गुरुस्मरण होत होते. त्यामुळे दिवसभर मन स्थिर होते.

१ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे पाद्यपूजन चालू असतांना ‘स्वतःला त्यांच्या पाद्यपूजनाची संधी मिळाली’, असे जाणवणे : गुरुमाऊलीचे ‘श्री दत्त’ रूपात दर्शन झाले. त्यांची पाद्यपूजा चालू असतांना ‘ते येथे सभागृहात उपस्थित असून मला त्यांची पाद्यपूजा करायची संधी मिळाली आहे. माझ्याकडून त्यांच्या चरणांवर आनंदाने आणि कृतज्ञताभावाने १०८ वेळा पुष्पे अर्पण झाली. मी त्यांच्या चरणांना सूक्ष्मातून स्पर्श केला, तेव्हा माझ्या देहाची शुद्धी झाली’, असे मला अनुभवता आले.

१ ई. सभागृहात शांततापूर्ण उत्साह जाणवणे : गुरुपौर्णिमेच्या संध्याकाळच्या सत्रात सभागृहात शांतता असूनही आनंद आणि उत्साह जाणवत होता. ‘आता एवढ्यात गुरुमाऊलीचे आगमन होणार आहे’, असे मला जाणवले.’

२. श्री. परेश गुजराथी 

२ अ. गुरुपौर्णिमेच्या प्रवचनाचा सराव करतांना अडखळणे; पण गुरुकृपेने प्रवचन पुष्कळ चांगले होणे : ‘गुरुपौर्णिमेच्या प्रवचनाचा सराव करतांना जीभ जड होऊन माझे बोलणे अडखळत होत होते. मी प.पू. गुरुदेवांना शरण जाऊन पुष्कळ प्रार्थना केल्या. व्यष्टी साधना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी सर्वकाही गुरुदेवांवर सोपवून प्रवचन केले. ‘प्रवचन अतिशय चांगले झाले’, असे अनेकांनी मला सांगितले. तेव्हा ‘हे केवळ परम पूज्यांच्या कृपेमुळेच झाले आणि त्यांनीच ते करून घेतले’, हे मला अनुभवता आले.

२ आ. सर्वत्र पुष्कळ पाऊस असूनही गुरुपौर्णिमेच्या प्रवचनाच्या सेवेसाठी जातांना गुरुकृपेने पाऊस न येणे : गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी प्रवास करतांना सर्वत्र पुष्कळ पाऊस पडत होता; परंतु गुरुपौर्णिमेला जाईपर्यंत आणि कार्यक्रम करून गुरुपौर्णिमेहून परत येईपर्यंत एकदाही पाऊस पडला नाही. त्यामुळे मी भिजलो नाही. यातून मला प.पू. गुरुदेवांची कृपा अनुभवता आली. त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !’

३. श्री. सुधाकर गुरव

३ अ. सेवेतील आनंद मिळणे आणि ‘गुरुचरणांची सेवा करत आहे’, असा भाव असणे : ‘गुरुपौर्णिमेच्या सेवेला आरंभ केल्यापासून मनात केवळ सेवेचे विचार होते. माझ्या मनात ‘मी गुरूंची चरणसेवा करत आहे’, असा भाव सातत्याने होता. त्यामुळे सेवा करतांना मला सेवेतील आनंद मिळाला.

३ आ. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करतांना त्रास जाणवूनही आनंद मिळणे : गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करतांना माझे मन एकाग्र झाले होते. ‘दोन्ही पायांत वेदना होऊन पायांतून काहीतरी निघून जात आहे. दोन्ही कानांतून काहीतरी बाहेर पडत आहे’, असे जाणवून मला असह्य वेदना होत होत्या. तरी ‘नामजप चालूच रहावा’, असे मला वाटत होते. एवढा त्रास जाणवूनही मला आनंद मिळत होता.

३ इ. रथोत्सव पहातांना आनंद मिळणे : गुरुमाऊलींचा रथोत्सव पहातांना ‘त्यात मी प्रत्यक्ष सहभागी आहे आणि प्रत्येक साधकामध्ये गुरुदेव आहेत’, असे मला जाणवत होते. तेव्हा माझा कृतज्ञताभाव जागृत होऊन भावाश्रू वहात होते.’

४. सौ. विद्या प्रफुल्ल कुडाळकर

४ अ. संतसेवेच्या आधी शारीरिक त्रास होऊन मनात नकारात्मक विचार वाढणे : गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम असतांना देवाने मला संतांसाठी स्वयंपाक करून त्यांना वाढण्याच्या सेवेची संधी दिली. त्या सेवेच्या ३ दिवस आधी माझी प्रकृती बिघडली. ‘डोके जड होणे, काहीही न सुचणे, छातीत धडधडणे’, इत्यादी त्रासांचे प्रमाण पुष्कळ वाढून माझे मन अस्वस्थ झाले. माझ्या मनात नकारात्मक विचार प्रचंड वाढल्यामुळे प्रत्यक्ष सेवेच्या दिवशी ‘ही सेवा करू नये. सेवेसाठी जाऊ नये, मला जमणार नाही, या सेवेसाठी ‘अन्य साधकाचे नियोजन करा’, असे उत्तरदायी साधकांना सांगावे’, असे विचार पुष्कळ तीव्रतेने येत होते.

४ आ. प्रार्थना करून सेवेला आरंभ केल्यावर सर्व त्रास थांबून हलके वाटणे : देवाने मनात विचार दिले, ‘हे विचार तुझे नाहीत. तू या विचारांवर मात कर.’ शेवटी प्रार्थना करून सकारात्मक राहून मी रंगीत तालीम असलेल्या ठिकाणी गेले. तिकडे जाऊन सेवा चालू केल्यावर हळूहळू मला हलके वाटू लागले. मला होणार्‍या त्रासांचे प्रमाण उणावत गेले आणि मनाची अस्वस्थता पूर्ण निघून गेली.

४ इ. कृतज्ञता : गुरुदेवांच्या कृपेने मला सद्गुरु सत्यवान कदम यांचा सत्संग मिळून त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली. ‘भगवंताच्या कृपेनेच मी हे सर्व अनभवू शकले’, यासाठी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

सर्व सूत्रांचा दिनांक (२८.८.२०२२)                    

(क्रमशः)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक