Nepal New PM :नेपाळमध्ये के.पी. शर्मा ओली यांनी चौथ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ !

नेपाळमधील कम्युनिस्ट पक्षाचे नेते के.पी. शर्मा ओली

काठमांडू – नेपाळमधील कम्युनिस्ट पक्षाचे नेते के.पी. शर्मा ओली यांनी चौथ्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी त्यांना पद आणि गोपनीयता यांची शपथ दिली. त्यानंतर ओली यांनी त्यांच्या मंत्रीमंडळात २२ मंत्र्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. यामध्ये ओली यांना पाठिंबा देणार्‍या ४ पक्षांच्या नेत्यांना स्थान देण्यात आले आहे.

१. नेपाळमध्ये राजेशाही संपुष्टात येऊन १६ वर्षे झाली. या १६ वर्षांत देशात १४ सरकारे स्थापन झाली आहेत. देशात राजकीय स्थिरता आणण्याचे मोठे आव्हान ओली यांच्यासमोर असेल.

२. माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड हे संसदेत विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी बहुमत सिद्ध करू न शकल्याने त्यांचे सरकार पडले. त्यानंतर राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-युनिफाइड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट’चे अध्यक्ष ओली यांची नेपाळच्या राज्यघटनेच्या कलम ७६-२ अंतर्गत नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली.

३. ओली यांना त्यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत संसदेत  विश्‍वासदर्शक ठराव जिंकावा लागेल. २७५ जागांच्या संसदेत ओली यांना किमान १३८ मतांची आवश्यकता आहे.

४. ओली यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ‘दोन्ही देशांमधील मैत्रीचे नाते अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक आहे’, असे मोदी यांनी म्हटले आहे.