रायगड – जिल्ह्यात अंबा आणि कुंडलिका नदीची पातळी धोक्याच्या पातळीपर्यंत वाढली आहे. अतीमुसळधार पावसाची चेतावणी हवामान विभागाने दिली आहे. जुलै अखेरपर्यंत अतीवृष्टी होण्याचा अंदाज आहे. यामुळे जिल्ह्यातील दरडप्रवण आणि पूरप्रवण गावांना सतर्क रहाण्याची चेतावणी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सर्व यंत्रणेला सुसज्ज रहाण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकार्यांनी प्रशासनाच्या सिद्धतेचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्हाधिकार्यांनी तहसीलदारांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यास सांगितले आहे, तसेच आणि स्थलांतर करण्याची कार्यवाही तात्काळ करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
पाटबंधारे, आरोग्य, महावितरण, बांधकाम विभाग, बंदर विभाग अशा महत्त्वाच्या विभागांना त्यांनी सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. संभाव्य साहाय्यासाठी साधनसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. सर्व शासकीय विभागप्रमुखांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या सूचनेनुसार आपापसांत योग्य समन्वय ठेवून सतर्क राहून काम करावे आणि योग्य नियोजन करून उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी जावळे यांनी या वेळी दिल्या. खाऊची पाकिटे, प्रथमोपचार पाकिटे, आरोग्य साधने, आपत्ती व्यवस्थापन साधने आदींची सिद्धताही ठेवण्यात आली आहे. खोपोली तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे.
मुंबईत संततधार !
मुंबई – शहर आणि उपनगरांत संततधार चालू आहे. मुंबईत मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील २ दिवसांपासून पावसाची रिपरिप चालू आहे. १३ जुलैला पहाटे मुसळधार पाऊस कोसळला. सतत पडणार्या पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचले होते.
कोकणात पावसाचा जोर वाढला !
कोकणात जोरदार पाऊस चालू झाला आहे. मोसमी वार्यांचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे सरकला आहे. तसेच महाराष्ट्रापासून ते उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर अल्प दाबाचा पट्टा कायम आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. मुंबई-पुणे मार्गावर बोरघाटात गुडघाभर पाणी साठले आहे. चिपळूण येथे वशिष्टी नदीचे पाणी बाजारपेठेत शिरले आहे.
भिवंडीत नागरिकांचे हाल !
ठाणे – जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी, म्हणजेच १४ जुलै या दिवशी पाऊस चालूच होता. भिवंडीत जोरदार पाऊस झाल्याने कामावरी नदीकाठच्या वस्त्यांच्या परिसरात गुडघाभर पाणी साचून ते आसपासच्या घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. या पाण्यात रस्त्यावर उभी असलेली बस अर्धी बुडली होती. नालेस्वच्छता योग्य प्रकारे होत नसल्यामुळेच प्रतिवर्षी भिवंडीत पाणी साचते, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या.