एका वर्तमानपत्रात विवाहविषयक विज्ञापने वाचनात आली. विवाह इच्छुकांच्या संदर्भातील आवश्यक माहिती दिल्यावर खाली ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ (विवाह न करता एकत्र रहाणे)ही चालेल’, अशी टीप देण्यात आली होती ! वर्तमानपत्रांमध्ये विवाहविषयक उपवर-वधू यांची विज्ञापने नेहमीच प्रकाशित होतात; मात्र आता सरसकटपणे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा विज्ञापनात उल्लेख वाचून धक्काच बसला. कालपर्यंत पाश्चिमात्य वाटणारी संकल्पना भारतात कधी रुळली ते कळलेही नाही. विवाहाच्या बंधनाला थेट आव्हान देणारीच ही संकल्पना नव्हे का ?
‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ ही अशी व्यवस्था आहे, जिथे जोडपे विवाहासारखे दीर्घकालीन नातेसंबंधात एकत्र रहातात; मात्र त्यास कायदेशीर मान्यता नाही. विवाहाचा निर्णय घेण्यापूर्वी एकमेकांना समजून (?) घेण्यासाठी जोडपे एकत्र रहाते, असे त्याचे समर्थन केले जाते. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये एकमेकांवर विश्वास ठेवून अनेक गोष्टी केल्या जातात. विश्वासाचा धागा तुटल्यास पुन्हा आपल्या आपल्या मार्गाने जायला दोघेही मोकळे ! पटले तर एकत्र रहायचे, नाही तर निर्विकारपणे वेगळे व्हायचे. विवाहबंधन एवढे साधे सोपे असते का ? प्रत्यक्षात हिंदु धर्मातील ‘विवाह संस्कार’ म्हणजे व्यवहार, ध्येयनिष्ठा, सामाजिक विचार, वधू-वर आणि त्यांचे कुटुंबीय यांचे मनोमीलन अन् प्रजोत्पादन अशा अनेक गोष्टींचा सुंदर मिलाप आहे. ‘धर्मनियंत्रित काम’, म्हणजे ‘विवाह संस्कार’ होय ! विवाह संस्कारामुळे श्रेष्ठ असा गृहस्थाश्रम प्राप्त होतो. हिंदु विवाह संस्कार हा सर्वांच्याच हिताचा असून तो अतिशय चांगला आणि पवित्र आहे. विवाह ही केवळ कुटुंबातील महत्त्वाची घटना नसून तिचे समाजाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे. धर्मसंपत्ती आणि प्रजासंपत्ती असे विवाहाचे दोन उद्देश मानले जातात. विवाह संस्कार म्हणजे देहशुद्धी, आत्म्याची शुद्धी, गुणांची वृद्धी, जीवन उंचावणे, सर्वार्थाने ते परिपूर्ण करणे, वरच्या पातळीवर नेणे, समृद्ध करणे. थोडक्यात आचार-विचार-उच्चार यांचा समतोल राखणे. सध्या हिंदु धर्माची हानी करण्यासाठीच कुटुंबसंस्थेवर आघात करण्याचा हा घाट घातला जात आहे. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे कोडकौतुक करणार्या पुरोगामी विचारसरणीच्या मते ‘विवाह संस्था स्त्रीचे शोषण करते. लग्नव्यवस्था परिपूर्ण आणि आदर्श नाही. त्यामुळे विवाहसंस्थेची आवश्यकता नाही.’ असे चुकीचे विचार पुरोगाम्यांनी पसरवले आहेत. मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीमधून निपजलेल्या बुद्धीजीवींना पुरोगाम्यांचा डाव लक्षात येत नाही. धर्म आणि साधना यांचे संस्कार नसल्याने ते या नवरूढीला फसतात. ‘विवाह’ म्हणजे दायित्व आहे, वचनबद्धता आहे, त्याग आहे. त्यामुळे हे पवित्र बंधन टिकवून विवाहसंस्था सुरक्षित राखणे, हे आपले कर्तव्य आहे !
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.