मुंबई – पंतप्रधानपदाची तिसर्यांदा शपथ घेतांना देशाचा विकास तिप्पट गतीने करण्याचा निश्चय आम्ही केला होता. या गतीने प्रत्यक्षात काम चालू आहे. महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास आहे, सशक्त वर्तमानकाळ आहे आणि समृद्ध भविष्यकाळ आहे. महाराष्ट्र उद्योग, कृषी आणि आर्थिक विकास यांचे शक्तीस्थान आहे. या शक्तीनेच मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवले आहे. महाराष्ट्राला जगातील आर्थिक समृद्ध राज्य करण्याचे आमचे ध्येय आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
१३ जुलै या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २९ सहस्र ४०० कोटी रुपयांहून अधिक किमतीचे रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्रांशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण झाले. गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे हा कार्यक्रम पार पडला.
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, १० वर्षांपूर्वी मुंबईतील मेट्रो मार्गाची लांबी ८ किलोमीटर होती. सद्यस्थितीत मेट्रोची लांबी ८० किलोमीटरपर्यंत वाढली आहे. यासह आणखी २०० किलोमीटर मेट्रोच्या मार्गाचे काम चालू आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रीय रस्तांमध्ये मागील १० वर्षांत तिप्पट वाढ झाली आहे.
तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी प्रयत्नरत !
आपल्या तीर्थक्षेत्रांचा विकास व्हावा, तेथील सुविधा वाढाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. पंढरपूर येथील वारीत लाखो भाविक सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र शासनाकडून वारकर्यांच्या सुविधांची काळजी घेण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीमार्गाचे २०० किलोमीटरपर्यंत, तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीमार्गाचे काम ११० किलोमीटरहून अधिक पूर्ण झाले आहे. लवकरच हे दोन्ही मार्ग यात्रेकरूंच्या सेवेसाठी सिद्ध होतील, असे नरेंद्र मोदी या वेळी म्हणाले.