पुढील ५ दिवस देशातील २३ राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता !
नवी देहली – भारतीय हवामान विभागाने येत्या ५ दिवसांत देशातील तब्बल २३ राज्यांत अतीवृष्टीची चेतावणी दिली आहे. उत्तरप्रदेशातील पुरामुळे ८०० गावांमध्ये पाणी शिरले आहे. देशभरात मोसमी पाऊस चालूच आहे. उत्तराखंडमधील जोशीमठ येथे भूस्खलनामुळे बंद झालेला बद्रीनाथ महामार्ग ८३ तासांनंतर खुला झाला आहे. चार धाम यात्रेतील भाविक मोठ्या संख्येने अडकून पडले होते.
Severe floods and rain in Uttar Pradesh; 800 villages affected
Heavy rain forecast in 23 states for the next 5 days !#MonsoonAlert #Landslides #Heavyrainfallpic.twitter.com/1f9AVcbOlc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 13, 2024
देशभरात हाहा:कार !
१. बिहारमध्ये गेल्या २४ तासांत वीज कोसळून आणखी २१ जणांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. केवळ वीज कोसळल्याने राज्यभरात जुलै महिन्यात आतापर्यंत ७० जण मारले गेले आहेत.
२. आसाममधील पूरग्रस्त स्थितीचा १२ लाखांहून अधिक लोकांना फटका बसला आहे. आतापर्यंत पूर आणि वीज कोसळणे यांमुळे १०६ लोकांना प्राणांपासून मुकावे लागले आहे.
३. हिमाचल प्रदेशातही पावसाच्या जोरदार सरी सतत कोसळत आहेत.
४. येत्या पाच दिवसांत देशातील २३ राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ‘रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट’ (विविध स्तरांवरील धोक्याची चेतावणी) जारी केला आहे.
५. सिक्किम, बंगाल, गुजरात, मुंबई, कोकण आणि गोवा येथे अनेक ठिकाणी अतीवृष्टी झाली आहे. याखेरीज आसाम, झारखंड, छत्तीसगड, पूर्व मध्यप्रदेश, ओडिशा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, आंध्रप्रदेशाची किनारपट्टी, कर्नाटकची किनारपट्टी आणि अंदमान निकोबार बेटांवरही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
६. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील परबतसर येथे सर्वाधिक ८९ मिमी, तर राज्यातील धौलपूर जिल्ह्यात असलेल्या सेपाऊ येथे ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हिमाचल प्रदेश राज्यातील १० रस्ते बंद आहेत.