Accused Odisha Governor Son : आलिशान गाडी पाठवली नाही; म्हणून ओडिशाच्या राज्यपालांच्या मुलाची अधिकार्‍याला बेदम मारहाण !

वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस यांनी तक्रारीची नोंद न घेतल्याचा पीडित अधिकार्‍याचा आरोप

राज्यपाल रघुवर दास

भुवनेश्‍वरी – ओडिशाचे राज्यपाल रघुवर दास यांच्या मुलाला रेल्वे स्थानकावरून आणण्यासाठी आलिशान गाडी पाठवली नाही; म्हणून मुलाने राज भवनमधील अधिकार्‍याला बेदम मारहाण केली. या अधिकार्‍याने संबंधित प्रकरण वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत आणि पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना दाद मिळाली नाही. वैकुंठ प्रधान असे मारहाण झालेल्या अधिकार्‍याचे नाव आहे. ओडिशा राज भवन सचिवालयातील घरगुती विभागात सहाय्यक विभाग अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ‘७ जुलैच्या रात्री राज्यपालांचा मुलगा ललित कुमार आणि त्याचे ५ सहकारी यांनी मिळून पुरी शहरातील राज भवनातच मला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली’, असा आरोप वैकुंठ प्रधान यांनी केला आहे.

१. प्रधान यांनी पुढे म्हटले की, ललित कुमारने मला मारल्यानंतर मी तात्काळ त्याच्या दालनातून पळालो आणि राजभवनमध्ये लपून बसलो; पण ललित कुमारच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी मला अडवले आणि फरपटत पुन्हा त्याच्या दालनात नेले. राजभवनचे कर्मचारी आणि ललित कुमारचे सुरक्षा रक्षक या घटनेचे साक्षीदार आहेत. तिथे नेल्यानंतर मला पुन्हा मारहाण करण्यात आली. तिथे जर माझी हत्या झाली असती, तरी मला कुणीही वाचवले नसते.

२. मारहाण झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी, म्हणजे ८ जुलैला प्रधान यांनी सचिवांना या घटनेची तोंडी माहिती दिली. त्यानंतर १० जुलै या दिवशी ई-मेलद्वारे सर्व घटनाक्रम कथन केला. वैकुंठ प्रधान यांच्या पत्नी सयोज यांनी भुवनेश्‍वरच्या राजभवनाबाहेर या घटनेचा निषेध करत पोलिसांना दिलेल्या तक्रारीचे पत्र माध्यमांना दाखवले. त्या म्हणाल्या, आम्ही ११ जुलै रोजी पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यासाठी गेलो; मात्र आमची तक्रार प्रविष्ट करून घेतली नाही. मग आम्ही ई-मेलद्वारे तक्रार पाठवली.

संपादकीय भूमिका 

  • या तक्रारीत जर तथ्य असेल, तर वडिलांचे पद आणि अधिकार यांमुळे उद्दाम झालेल्या राज्यपालाच्या मुलाला कठोर शिक्षा देणे आवश्यक !
  • तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करून आरोपीला पाठीशी घालणारे प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस कायद्याचे राज्य काय देणार ?