छत्रपती शिवरायांचा पराक्रम शिवकालीन १२ दुर्ग विश्वात पोचवणार !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई, १२ जुलै (वार्ता.) – २१ ते ३१ जुलै या कालावधीत नवी देहली येथे होणार्‍या ४६ व्या जागतिक वारसा केंद्र अधिवेशनात महाराष्ट्रातील ११ आणि तमिळनाडू येथील १ असे १२ गड-दुर्ग छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम मांडणार आहेत. साल्हेर (नाशिक), प्रतापगड (सातारा), राजगड (पुणे), खांदेरी (रायगड) हे राज्यसंरक्षित गड, तर रायगड (रायगड), सिंधुदुर्ग (सिंधुदुर्ग), विजयदुर्ग (सिंधुदुर्ग), सुवर्णदुर्ग (रत्नागिरी), पन्हाळा (कोल्हापूर), शिवनेरी (पुणे), लोहगड (पुणे) आणि तमिळनाडू येथील जिंजी या गड-दुर्गांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. या गडांच्या भव्य प्रतिकृती या अधिवेशनात ठेवण्यात येणार आहेत.

दुर्ग आणि अन्य ऐतिहासिक वारसा जपणारा, गिर्यारोहणाचा प्रसार करणारा मुंबई येथील ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघ’ या प्रतिकृती सिद्ध करणार आहे. १ कोटी २२ लाख ८२ सहस्र रुपयांना राज्यशासन या प्रतिकृती खरेदी करणार आहे. ‘मराठा लष्करी किल्ले’ या सदराखाली या दुर्ग आणि गड यांच्या प्रतिकृती नवी देहली येथील जागतिक वारसा केंद्र अधिवेशनात सादर केल्या जातील. या सर्व कार्यक्रमाचे नियंत्रण पुरातत्व विभागाचे संचालक करणार आहेत.