एक सदस्यीय समितीची स्थापना, राज्य सरकारकडूनही अहवाल पाठवला जाणार !
पुणे – ‘भारतीय प्रशासकीय सेवे’तील (आय.ए.एस्.) प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयातील एका अतिरिक्त सचिवांकडून ही चौकशी केली जाईल. पुण्याच्या जिल्हाधिकार्यांनी सिद्ध केलेला अहवालही केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातून (यु.पी.एस्.सी.) नॉन क्रिमिलेयर आणि बहुविकलांगता (मल्टिपल डिसॅबिलिटी) या २ प्रकारांतून खेडकर यांची नियुक्ती झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने सांगूनही त्या ६ वेळेस वैद्यकीय पडताळण्यांसाठी अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांच्या निवडीला ‘केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणा’त (कॅट) आव्हान देण्यात आले होते. न्यायाधिकरणाने खेडकर यांच्या विरोधात निर्णय दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी बहुविकलांगतेविषयी स्वत:हून तपासणी केलेले एम्.आर्.आय. प्रमाणपत्र स्वीकारण्यात आल्याचेही समोर येत आहे, तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशिक्षणार्थी असतांना केलेल्या चुकीच्या वर्तणुकीची चौकशी करण्यात येणार आहे.
पूजा खेडकर यांच्या आईची पोलिसांना दमदाटी !
पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी गाडीवर लाल दिव्याचा वापर केला आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी थकित २१ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्याची कारवाई पुणे पोलिसांनी चालू केली आहे. गाडी कह्यात घेणे आणि दंड वसुलीसाठी पोलीस घरी गेले असता पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांना दमदाटी केली. तटभिंतीच्या दरवाजाला कुलूप लावले. त्यामुळे पोलिसांना कारवाई न करताच माघारी परतावे लागले.