Roman Babushkin Indians In Army :  भारतियांना आमच्या सैन्यात भरती करण्यासाठी आम्ही स्वतःहून काहीच प्रयत्न केले नाहीत !

भारतातील रशियाच्या राजदूतांचा दावा !

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉस्को येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेऊन रशियाच्या सैन्यात भारतियांना भरती करण्याचे सूत्र उपस्थित केले. यावर पुतिन यांनी भारतियांना रशियातून परत पाठवण्याची संमती दिली. या संदर्भात रशियाचे भारतातील राजदूत रोमन बाबुश्किन यांनी म्हटले की, आम्ही कोणत्याही भारतियाला सैन्यात सामील करून घेण्यासाठी मोहीम राबवली नाही किंवा विज्ञापनही दिले नाही. तसे करण्याची रशियाची इच्छाही नाही. भारतीय लोक रशियाच्या सैन्यात कोणत्याही परिस्थितीत भरती झाले असले, तरी त्यांना लवकरच भारतात पाठवले जाईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.


राजदूत रोमन बाबुश्किन पुढे म्हणाले की, सध्या अधिकाधिक १०० भारतीय सैन्याशी संबंधित आहेत; परंतु रशियाच्या सैन्याचा आकार पहाता हे प्रमाण फारच अल्प आहे. सैन्यात सहभागी होणार्‍या भारतियांचा संबंध व्यावसायिक कराराशी असू शकतो; कारण त्यांना पैसे कमवायचे होते. आम्हाला त्यांची भरती करायची नव्हती.

युक्रेन युद्धात मारल्या गेलेल्या भारतियांना रशियाचे नागरिक म्हणून अधिकृत मान्यता दिली जाईल का ?, असे राजदूतांना विचारले असता ते म्हणाले की, असे होऊ शकते; कारण काही वेळा करारांमध्ये अशा अटी असतात.