UAE : ‘पॅलेस्टाईन मुक्त करा’च्या घोषणा देणार्‍या विद्यार्थ्याला संयुक्त अरब अमिरातने देशातून हाकलले !

अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात) – येथील न्यूयॉर्क विद्यापिठात मे मासामध्ये पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी एका विद्यार्थ्याने ‘फ्री पॅलेस्टाईन’ (पॅलेस्टाईन मुक्त करा) अशी घोषणा दिली. यानंतर त्यास अटक करण्यात आली. आता त्याला देशातून हाकलून देण्यात आले आहे. या विद्यार्थ्याचे आणि त्याच्या देशाचे नाव समजू शकले नाही.

१. न्यूयॉर्क विद्यापिठातील एका विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पदवीदान समारंभाच्या आधी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते की, विद्यापिठाच्या परिसरात कुठेही पॅलेस्टिनी ध्वज फडकवण्याची अनुमती नाही आणि याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. निवासी इमारतींमध्येही याचे पालन करण्यात आले.

२. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी इस्रायलवर आक्रमण केले. यात १ सहस्र २०० लोक मारले गेले, तर २५० लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. यानंतर इस्रायलने प्रत्युत्तर दिले. प्रत्युत्तरादाखल केलेल्या आक्रमणात गाझातील ३८ सहस्र लोक मारले गेले आहेत. जगभरातील इस्लामी देशांनी इस्रायलचा निषेध केला आहे; मात्र संयुक्त अरब अमिरातने इस्रायलशी राजनैतिक संबंध कायम ठेवले आहेत. दोघांमध्ये विमान वाहतूकही चालू आहे.

संपादकीय भूमिका

भारताच्या संसदेत शपथ घेतांना एम्.आय.एम् पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी ‘जय पॅलेस्टाईन’ची घोषणा देतात आणि त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही, हे भारताला लज्जास्पद !