पुणे येथील ‘आय.एल्.एस्. विधी महाविद्यालया’त जातीयवाद आहे का ? याचे अन्वेषण करा ! – मुंबई उच्च न्यायालय

पुणे – शहरातील प्रतिष्ठित ‘आय.एल्.एस्. विधी महाविद्यालया’मध्ये (इंडियन लॉ सोसायटी) जातीयवाद आहे का ? याचे अन्वेषण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या विधी महाविद्यालयातील ११८ हून अधिक विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यांनी २१ मे या दिवशी मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांना याविषयी पत्र लिहिले होते. न्यायालयाने प्रशासकीय बाजूने उच्च शिक्षण संचालनालय, पुणे यांनी अन्वेषण करावे, असे सुचवले आहे.

पत्रामध्ये संस्थात्मक जातीयवाद, रॅगिंग, लैंगिक छळ, गुंडगिरी, पक्षपात आणि अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना वाईट वागणूक दिली जाते. महाराष्ट्रीय ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना विविध पदांवर नियुक्त केले जाते. त्यांना ‘प्राधान्य वागणूक’ दिली जाते. महाविद्यालयामध्ये गेल्या ३ वर्षांपासून ‘फुले आंबेडकर स्मृती व्याख्यान’ आयोजित करण्यास प्रतिबंध केला जातो. ब्राह्मणेत्तर विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता असूनही अनेकदा क्षुल्लक कारणांसाठी उदासिनता आणि शत्रुत्वाचा सामना करावा लागतो, अशा स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत.