Tripura HIV Case : त्रिपुरात ८०० हून अधिक विद्यार्थी ‘एच्आयव्ही’ बाधित !

अमली पदार्थांच्या इंजेक्शनच्या वापराचा परिणाम !

अगरताळा – त्रिपुरामध्ये ‘एच्आयव्ही-एड्स’च्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. येथील ८०० हून अधिक विद्यार्थी ‘एच्आयव्ही’ बाधित असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये ‘एच्आयव्ही’चा प्रसार होण्याचे मुख्य कारण म्हणजे अमली पदार्थांच्या इंजेक्शनचा वापर, हे आहे.

त्रिपुराच्या ‘एड्स कंट्रोल सोसायटी’च्या अधिकार्‍याने सांगितले की, अलीकडेच ८२८ विद्यार्थ्यांना ‘एच्आयव्ही’ झाल्याचे आढळून आले आहे, तर ४७ विद्यार्थ्यांचा एड्समुळे मृत्यू झाला आहे. त्रिपुरामध्ये ‘एच्आयव्ही’चे प्रतिदिन ५ ते ७ नवीन रुग्ण आढळत आहेत, असे या अधिकार्‍याने सांगितले.

असुरक्षित लैंगिक संबंधातून ‘एच्आयव्ही’चा संसर्ग पसरण्याचा सर्वाधिक धोका असतो. तसेच अमली पदार्थांच्या इंजेक्शनमुळे ‘एच्आयव्ही’चा प्रसार होतो. ‘एच्आयव्ही’ बाधित विद्यार्थ्याने वापरलेली अमली पदार्थांच्या इंजेक्शनची सुई दुसर्‍या विद्यार्थ्याने वापरली, तर त्यालाही संसर्ग होतो. त्रिपुरातील २२० शाळा आणि २४ महाविद्यालय-विद्यापीठ यांमध्ये ‘एच्आयव्ही’ची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ‘एड्स कंट्रोल सोसायटी’चे सहसंचालक सुभ्रजित भट्टाचार्जी यांनी सांगितले की, ‘एच्आयव्ही’ बाधित बहुतांश विद्यार्थी हे श्रीमंत कुटुंबातील आहेत. जेव्हा पालकांना हे समजते की, त्यांच्या मुलाला अमलीपदार्थ सेवनाचे व्यसन आहे, तोपर्यंत फार उशीर झालेला असतो.

‘नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन’च्या अहवालात असे दिसून आले आहे की, इंजेक्शनच्या औषधांमुळे मिझोरममध्ये सर्वाधिक ‘एच्आयव्ही’ची लागण झाली आहे. मिझोरममध्ये ‘एच्आयव्ही’ बाधित झालेल्यांपैकी अनुमाने २० टक्के लोकांनी इंजेक्शन औषधे वापरली. यात देहली दुसर्‍या स्थानावर आहे, जिथे अशा संक्रमित लोकांची संख्या १६ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

संपादकीय भूमिका

विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच साधना शिकवली असती, तर त्यांना व्यसनातून मिळणार्‍या क्षणिक सुखापेक्षा सातत्याने मिळणारा आनंद अनुभवता आला असता आणि त्यांनी जीवघेण्या व्यसनांकडे पाठ फिरवली असती !