सैनिकांवर आक्रमण करणार्या आतंकवाद्यांना स्थानिक मार्गदर्शकाने केले होते साहाय्य !
कठुआ (जम्मू-काश्मीर) – ८ जुलैच्या दुपारी जिहादी आतंकवाद्यांनी येथे केलेल्या आक्रमणात एका कनिष्ठ आयुक्त अधिकार्यासह ५ सैनिकांना वीरमरण आले. यानंतर सैन्याने परिसराला वेढा घातला. ९ जुलैलाही आतंकवाद्यांची शोधमोहीम आणि चकमक चालू असल्याचे समजते. सैनिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे आक्रमण ३ आतंकवाद्यांनी केले. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे आहेत. या आतंकवाद्यांनी अलीकडेच सीमेपलीकडून घुसखोरी केली होती. एका ‘लोकल गाइड’नेही (स्थानिक मार्गदर्शकानेही) त्यांना आक्रमणात साहाय्य केले. गेल्या ३ दिवसांत झालेल्या विविध आतंकवादी आक्रमणात एकूण ७ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले आहेत.
(म्हणे) ‘काश्मीरला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा लढा चालूच रहाणार !’ – कश्मीर टायगर्स
‘कश्मीर टायगर्स’ नावाच्या आतंकवादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे. ही संघटना बंदी घातलेल्या ‘जैश-ए-महंमद’ची शाखा मानली जाते. कठुआच्या बडनोटा येथे भारतीय सैन्यावर ‘हँड ग्रेनेड’ आणि ‘स्निपर गन’ने आक्रमण करण्यात आले. काही दिवसांपूर्वी डोडा येथे मारल्या गेलेल्या ३ आतंकवाद्यांच्या मृत्यूचा हा सूड आहे. लवकरच आणखी आक्रमणे केली जातील. काश्मीरला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा लढा चालूच रहाणार आहे, असे या आतंकवादी संघटनेने म्हटले आहे.
‘शत्रूसाहाय्यक कायद्या’चा वापर करून वर्षाच्या शेवटापर्यंत आतंकवादाचा नायनाट करण्याचे लक्ष्य !
या वर्षाच्या शेवटी जम्मू भागातून आतंकवाद संपवण्याची योजना सैन्याने बनवली आहे. नुकत्याच गृह मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर पूंछ, राजौरी, रियासी आणि कठुआ येथे सक्रीय असलेल्या ३० आतंकवाद्यांची यादी बनवण्यात आली असून आतंकवादी आणि त्यांच्या साहाय्यकांना मारण्यासाठी ‘अॅनिमी एजंट्स लॉ’ (शत्रूसाहाय्यक कायदा) पुन्हा मूळ स्वरूपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कायद्यात आतंकवाद्यांना साहाय्य करणार्यांची मालमत्ता जप्त करण्यापासून ते जन्मठेप आणि मृत्यूदंड देण्यापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. वर्ष १९४८ मध्ये परदेशी आतंकवादी आणि घुसखोरांचा नायनाट करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली होती. सध्या ‘यूएपीए’ कायदा (बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा) लागू असला, तरी ‘शत्रूसाहाय्यक कायदा’ आणखी कठोर आहे.
संपादकीय भूमिकाकाश्मिरातून कलम ३७० हटवले असले, तरी तेथील जिहादी आतंकवादी कारवाया पुन्हा एकदा वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे जिहादी आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्याला साहाय्य करणार्या स्थानिकांनाही मृत्यूदंडाची शिक्षा देणेच आवश्यक ! |