Maldives Invites Indian Cricket Team : विश्‍वविजेत्‍या भारतीय क्रिकेट संघाला मालदीवला भेट देण्‍याचे निमंत्रण !

मालदीव पर्यटक संघटना आणि पर्यटक जनसंपर्क महामंडळ यांचे निमंत्रण

भारतीय क्रिकेट संघ

माले – मालदीव पर्यटक संघटना आणि पर्यटक जनसंपर्क महामंडळ यांनी टी २० विश्‍वचषक विजेत्‍या भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा यांच्‍या नेतृत्‍वाखालील भारतीय संघाला मालदीवला भेट देण्‍याचे खुले आमंत्रण पाठवले आहे.

१. मालदीवचे राष्‍ट्राध्‍यक्ष महंमद मुइज्‍जू यांच्‍या मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यावर टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांच्‍यावरील टीकेनंतर भारतीय पर्यटकांनी मालदीवकडे पाठ फिरवली होती.

२. या घोड चुकीमुळे मालदीवने केलेल्‍या कल्‍पनेपेक्षा त्‍याला अधिक किंमत मोजावी लागली. मालदीवला भेट देणार्‍या भारतीय पर्यटकांच्‍या संख्‍येत सुमारे ४० टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. त्‍यामुळे मालदीवला आर्थिक फटका बसला होता.

३. मालदीवने आता ही चूक सुधारण्‍याचे ठरवले आहे. ‘मालदीव मार्केटिंग अँड पब्‍लिक रिलेशन्‍स कॉर्पोरेशन’चे व्‍यवस्‍थापकीय संचालक  इब्राहिम शिउरी आणि मालदीव पर्यटक संघटनेचे सरचिटणीस अहमद नजीर यांनी भारतीय क्रिकेट संघाच्‍या स्‍वागतासाठी उत्‍सुक असल्‍याचे म्‍हटले आहे.

४. ‘हे निमंत्रण मालदीव आणि भारत यांच्‍यातील बळकट दीर्घकालीन सांस्‍कृतिक आणि क्रीडा संबंध यांचे प्रतिबिंब आहे. भारतीय क्रिकेट संघाचे स्‍वागत करणे, त्‍यांच्‍या विजयाच्‍या आनंदात सहभागी होणे हा मालदीवसाठी मोठा सन्‍मान असेल’, असे इब्राहिम शिउरी यांनी म्‍हटले आहे.

५. भारतीय संघ मालदीवमध्‍ये आल्‍यास येथील पर्यटकांच्‍या संख्‍येत वाढ होऊ शकते. अधिक भारतीय पर्यटकांना आपल्‍याकडे खेचण्‍याची ही मालदीवची खेळी आहे.

संपादकीय भूमिका

चीनच्‍या तालावर नाचणार्‍या मालदीववर भारतीय पर्यटकांनी बहिष्‍कार घातल्‍यामुळे त्‍याचे धाबे दणाणले असून त्‍याला उपरती झाली आहे, हेच यातून दिसून येते !