बेलवडी (इंदापूर) येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अश्वांचे पहिले गोल रिंगण उत्साहात पार पडले !

भव्य रिंगणाचे टिपलेले मनोहारी आणि आनंददायी दृश्य !

पुणे – ‘विठोबा-रखुमाई’, ‘ग्यानबा-तुकाराम’च्या जयघोषामध्ये, भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मानाच्या अश्वांचे पहिले गोल रिंगण बेलवडी (तालुका इंदापूर) येथे पार पडले. अतिशय भावपूर्ण वातावरणामध्ये, पावसाच्या हलक्या सरींच्या वर्षावात हे रिंगण वारकरी आणि भाविक यांनी आनंदाने अनुभवले. संपूर्ण बेलवडी परिसर वारकर्‍यांच्या भक्तीरसाने न्हाऊन निघाला.

इंदापूर तालुक्यातील सणसर येथील मुक्काम आटोपून जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बेलवडी येथे आला. मानाच्या अश्वांचे गोल रिंगण पहाण्यासाठी वारकरी आणि भाविक यांनी लाखोंच्या संख्येने गर्दी केली होती.

रिंगणाच्या प्रारंभी बेलवडी येथील कै. शहाजी मचाले यांच्या मेंढ्यांनी पालखीला प्रदक्षिणा घातली. जगद्गुरु संत तुकाराम महाराज देवस्थानचा अश्व आणि मोहिते पाटील यांचा अश्व या २ अश्वांनी वायूवेगाने मैदानाला ३ प्रदक्षिणा घातल्या. झेंडे, तुळशी हंडा घेतलेल्या महिला वारकरी, विणेकरी, पोलीस अधिकारी आणि शासकीय अधिकारी यांनी रिंगण पूर्ण केले. टाळकरी, पखवाजाच्या गजरात वारकर्‍यांनी फुगडी, लांब उड्या, दोरीवरच्या उड्या मारून कसरती केल्या.