सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थितीमुळे जनतेची गैरसोय

मुंबई-गोवा महामार्गासह अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प

मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस येथे रस्त्यावर आलेले पाणी

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात ७ जुलै या दिवशी झालेल्या अतीवृष्टीमुळे नद्या, नाले, ओहोळ यांना पूर आल्याने अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरे, गोठे, दुकाने यांत पाणी शिरल्याने, तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक खोळंबली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांतील भातशेतीही पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्यांनी पाण्याची पातळी ओलांडल्याने किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

सावंतवाडी – शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणी साचले होते. काही ठिकाणी दुकानांत पाणी शिरले होते. तेरेखोल नदीने धोकादायक पातळी ओलांडली असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेची चेतावणी दिली आहे. तेरेखोल नदीला पूर आल्याने बांदा बाजारपेठ आणि बसस्थानक येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. ओटवणे येथे नदीला पूर आल्याने सरमळे सपतनाथ येथे पाणी रस्त्यावर येऊन वाहतूक ठप्प झाली आहे.

कुडाळ – कसाल येथे मुंबई-गोवा महामार्गालगत असलेला डोंगर अतीवृष्टीने ढासळत असून पावसामुळे माती आणि पाणी महामार्गावर आले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. माणगांव खोर्‍यातील निर्मला नदीला पूर आल्याने आंबेरी पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे येथील २७ गावांचा संपर्क सुटला आहे. ओरोस येथे मुंबई-गोवा महामार्गावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कुडाळ शहरात भंगसाळ नदीला पूर आल्याने मुंबई-गोवा महामार्ग ते पंचायत समिती कार्यालय हा मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. तसेच रेल्वेस्थानकाकडे जाणार्‍या मार्गावरील वाहतुकही विस्कळीत झाली होती.

माणगाव येथे वृद्ध वाहून गेला

माणगाव खोर्‍यातील आंबेरी येथील पूल पाण्याखाली गेला असून या पुलावरून जाणारे दत्ताराम लाडू भोई (वय ६० वर्षे, रहाणार वरची बेणवाडी, माणगाव) हे पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने वाहून केले.

दोडामार्ग – दोडामार्ग ते वीजघर राज्य मार्गावरून पाणी वहात असल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. तालुक्याचा आठवडा बाजार असून बाजारपेठेतही पाणी आले आहे. तेरवण-मेढे बंधार्‍याच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. बंधार्‍याच्या सातही दरवाजातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. हे पाणी तिलारी नदीला मिळत असल्याने नदीची पाण्याची पातळी वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी दिली आहे. कळणे नदीला गेल्या ५० वर्षांत प्रथमच मोठ्या प्रमाणात पूर आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

वेंगुर्ला – तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. वेंगुर्ला-सावंतवाडी मार्गावर होडावडा येथे नदीला पूर आल्याने येथील पूल पाण्याखाली गेला. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

यासह जिल्ह्यात अन्यत्रही मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

वन विभागाच्या चौकीवर झाड कोसळून कर्मचारी गंभीर घायाळ

सावंतवाडी येथील नरेंद्र डोंगर येथे वन विभागाच्या चौकीवर  झाड पडून तेथे सेवारत असलेले कर्मचारी माजी सैनिक विद्याधर सावंत गंभीर घायाळ झाले आहेत.

अतिवृष्टी मुळे उद्या दिनांक ८ जुलै २०२४ रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना तसे निर्देश दिलेले आहेत. – मा. श्री. दीपक केसरकर,  मंत्री,शालेय शिक्षण व मराठी भाषा,महाराष्ट्र राज्य