Shivsena Punjab : ‘शिवसेना पंजाब’चे नेते संदीप थापर गोरा यांच्यावर प्राणघातक आक्रमण : प्रकृती चिंताजनक

  •  निहंग शिखांच्या वेशातील ४ जणांनी भररस्त्यात दिवसाढवळ्या केले आक्रमण

  •  खलिस्तानविरोधी विधानांमुळे आक्रमण झाल्याची शक्यता

  •  संदीप थापर हे क्रांतीकारक सुखदेव यांचे आहेत नातेवाईक

(निळ्या रंगाचे कपडे परिधान करून शस्त्र बाळगणार्‍या योद्धा शिखांना निहंग शीख म्हणतात.)

‘शिवसेना पंजाब’चे नेते संदीप थापर गोरा

लुधियाना (पंजाब) – येथे ‘शिवसेना पंजाब’चे नेते संदीप थापर गोरा यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले असून त्यात ते गंभीररित्या घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. निहंग शिखांच्या वेशातील ४ जणांनी संदीप थापर यांच्यावर धारदार शस्त्रांनी आक्रमण केले. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण समोर आले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. संदीप थापर क्रांतीकारक सुखदेव यांचे नातेवाईक आहेत.

अंगरक्षक पोलीस निष्क्रीयपणे उभा होता !

संदीप थापर गोरा हे त्यांच्या बंदूकधारी पोलीस अंगरक्षकासह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी आले होते. येथून ते त्यांच्या दुचाकीवरून जात असतांना त्यांच्यासमोर ४ निहंग शीख आले. त्यांना पाहून संदीप थापर यांनी हात जोडून नमस्कार केला; मात्र या शिखांनी त्यांच्या डोक्यावर तलवारीने जोरदार वार केला. (आता अशा शिखांना नमस्कार करायचा कि सतर्क रहायचे ?, हे नेते आणि जनता यांनी ठरवायला हवे ! – संपादक) यामुळे संदीप थापर खाली पडल्यावरही आरोपी त्यांच्यावर वार करत होते. या वेळी त्यांच्या बंदूकधारी अंगरक्षकाला अन्य निहंगांनी घेरले होते. त्या वेळी त्याने थापर यांना वाचवण्यासाठी काहीही केले नाही. तो निष्क्रीयपणे उभा होता. (अशा प्रकारचे आक्रमण झाले, तर एकटा पोलीस काहीही करू शकणार नाही, हे संरक्षण पुरवणार्‍या सरकारच्या आणि वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या का लक्षात आले नाही ? या घटनेनंतर तरी अन्य नेत्यांच्या संरक्षणात वाढ करण्यात येईल का ? – संपादक) आक्रमणानंतर २ आरोपी थापर यांच्याच दुचाकीवरून पळून गेले. या वेळी रस्त्यावर उपस्थित लोकही निमूटपणे हा प्रकार पहात होते. (भारतीय जनता अशा घटनांत नेहमीच अशी का वागते ?, याचा अभ्यास सरकार कधी करणार ? आणि त्यावर उपाय कधी काढणार ? – संपादक) आक्रमणात घायाळ झाल्यावर थापर यांना सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने तेथून त्यांना मोठ्या रुग्णालयात नेण्यात आले.

खलिस्तानविरोधी विधानांमुळे आक्रमण !

थापर यांच्यावरील आक्रमणांला त्यांची खलिस्तानविरोधातील वक्तव्ये कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. ते खलिस्तानविरोधातील विधाने वारंवार करत असतात. काही वर्षांपूर्वी झालेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या विरोधातही त्यांनी विधाने केली होती. अनेक दिवसांपासून थापर यांना धमक्या दिल्या जात होत्या. त्यानंतर त्यांना पोलीस संरक्षण पुरवण्यात आले.

संपादकीय भूमिका

  • पंजाबमध्ये खलिस्तानसमर्थक उघडपणे हिंदु नेत्यांना ठार मारत आहेत; मात्र पंजाबमधील शासनकर्ते खलिस्तान्यांविरुद्ध काहीही कारवाई करत नाही. आम्ही काहीतरी करत आहोत, हे दाखवण्यासाठी ते हिंदु नेत्यांना संरक्षण पुरवतात; मात्र ते किती तकलादू असते ?, ते या घटनेवरून लक्षात येते !
  • जर हे आक्रमण निहंग शिखांनीच केले असेल, तर अशा खलिस्तान्यांवर आता बंदी घालण्यासाठी हिंदूंनी मागणी केली पाहिजे !