सर्वसामान्य वीज ग्राहकांना ‘प्रीपेड स्मार्ट मीटर’ नाही !
(प्रीपेड स्मार्ट मीटर – विजेचा वापर नोंद करणारे यंत्र)
मुंबई, ५ जुलै (वार्ता.) – स्मार्ट प्रीपेड मीटरविषयी चुकीचा समज निर्माण करण्याचा प्रयत्न झाला; मात्र ‘स्मार्ट मीटर’ केवळ सरकारी कार्यालये आणि महावितरण आस्थापने यांमध्ये बसवण्यात येतील. सर्वसामान्य ग्राहकांसाठी ‘स्मार्ट मीटर’ नाहीत’, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ जुलै या दिवशी विधानसभेत दिली, तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत ९ लाख ५० सहस्र लक्षांक वीज उपलब्ध आहे. त्यामुळे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणली आहे, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा नियम २९३ अन्वये सभागृहात मांडलेल्या प्रस्तावावर झालेल्या चर्चेत सदस्यांनी ऊर्जा विभागाच्या अनुषंगाने उपस्थित केलेल्या विषयांसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, स्मार्ट मीटरची निविदा प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे राबवण्यात आली. यात एकूण ५ आस्थापनांना काम देण्यात आले. स्पर्धात्मक निविदांत ८ आस्थापने आली. त्यामुळे केवळ विशिष्ट लोकांना लाभ होईल, या आरोपांमध्ये तथ्य नाही. ‘स्मार्ट मीटर’ केवळ सरकारी कार्यालय आणि महावितरण आस्थापनांना लावण्यात येणार आहेत. यासाठी अतिरिक्त खर्च येणार नाही.