१५ दिवसांमध्ये अहवाल देण्याचे आयुक्तांचे आदेश
पिंपरी (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘जिजामाता रुग्णालया’मध्ये केसपेपर (रुग्णाच्या आजाराच्या माहितीचा कागद), रुग्ण शुल्क म्हणून ठराविक रक्कम आकारली जाते. रुग्णालयातील संबंधित लिपिक, वैद्यकीय अधिकारी तिचा प्रतिदिन भरणा करणे आवश्यक आहे. असे असतांनाही १ मार्च ते ३० एप्रिल या २ महिन्यांतील या रकमेत अंदाजे १० लाख रुपयांचा अपहार करण्यात आला आहे. या आर्थिक अपहाराचे लेखापरीक्षण करून त्याचे दायित्व कुणाकडे आहे, याचे अन्वेषण करावे. त्याचा अहवाल १५ दिवसांमध्ये सादर करावा, असा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी काढला आहे.
जिजामाता रुग्णालयात केसपेपर, रुग्ण शुल्क म्हणून १ मार्च ते ३० एप्रिल या समयमर्यादेत १८ लाख ६६ सहस्र ३५६ रुपये रक्कम जमा झाली होती; मात्र त्यातील ८ लाख ८९ सहस्र ६६५ रुपये एवढी रक्कम अधिकोषामध्ये (बँकेत) जमा करण्यात आली आहे. त्यात १० लाख रुपयांचा अपहार झाल्याचा संशय आहे. ही रक्कम प्रतिदिन अधिकोषामध्ये भरणे आवश्यक असतांनाही ती जमा केली नाही. उलट बँकेच्या अधिकार्यांनीही जिजामाता रुग्णालयाच्या भरणा रजिस्टरवर (खातेवहीमध्ये) बँकेचे शिक्के मारलेले आहेत.