ईश्वरापुढील विराट नमन !

भारतीय क्रिकेट संघाने २९ जून २०२४ या दिवशी ‘२०-२० षटकां’च्या क्रिकेटचा ‘विश्वचषक’ जिंकला ! सामना जिंकल्यानंतर भारतीय फलंदाज विराट कोहली याच्याशी समालोचक जतीन सप्रू याने वार्तालाप केला. विराटने तेव्हा जे सांगितले, त्याचा आशय आपण पाहूया. तो म्हणाला, ‘‘मी या विजयाविषयी ईश्वराची कृतज्ञता व्यक्त करतो. गेले काही मास मला ईश्वर वेगवेगळ्या प्रसंगांतून शिकवत होता. माझ्या अहंकाराला वारंवार ठेच लागत होती. विविध प्रसंगी मला माझ्या अहंकाराची जाणीव होत होती. अनेकदा मला माघार घ्यावी लागली. त्यातूनही ईश्वरानेच मला ऊर्जा दिली. खेळाडू म्हणून माझ्या नावावर विक्रम नोंदवले जात होते; मात्र ईश्वर लीला घडवून मला माणूस म्हणून अधिकाधिक प्रगल्भ बनवत होता. माघार घेतल्याने आनंद मिळतो, हे मी आज २०-२० षटकांचा शेवटचा सामना खेळतांना शिकलो. या विश्वचषकात माझ्या म्हणाव्या तशा धावा झाल्या नाहीत, त्यामुळे मी खिन्न होतो; पण ईश्वरानेच माझ्याकडून या सामन्यासाठी ५९ चेंडूत ७६ धावांची खेळी करून घेतली. आपण तळमळीने प्रयत्न करतो; पण ईश्वर त्याला जेव्हा द्यायचे असते, तेव्हाच देतो. ज्या पद्धतीने तो आम्ही जिंकलो, त्याविषयी पुन्हा ईश्वराचे आभार !’’

१. आक्रमक स्वभावाचा विराट !

विराटचे मत हे व्यावहारिक आणि आध्यात्मिक दृष्टींनीही महत्त्वाचे आहे. वर्ष २००८ मध्ये विराटने स्वतःच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट सामन्यांचा विश्वचषक भारतात जिंकून आणला होता. तेव्हा भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या कारकीर्दीचा शेवटचा टप्पा चालू होता. ‘विराट सचिनचा वारसदार ठरेल’, असे सर्वांनी गृहित धरले होते; मात्र हे केवळ धावांच्या आकडेवारीच्या संदर्भात खरे ठरले. माणूस म्हणून विराट सचिनपेक्षा अत्यंत वेगळा होता. विराटचा स्वभाव आक्रमक ! जितके कौशल्य त्याच्यात ठासून भरले होते, तितकाच त्याचा अहंकारही टोकदार होता.

श्री. सागर निंबाळकर

२. विराट आणि देश यांची झालेली हानी

विराटच्या अहंकारामुळे काही महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये देशाची हानीही झाली. वर्ष २०१५ च्या विश्वचषकाचा उपांत्य सामना न्यूझीलंडसह होता. विराटकडे नेतृत्व होते. त्याने भारतीय संघाचे तत्कालीन प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या समादेशाला न जुमानता फिरकीपटू कुलदीप यादवला संघात घेतले नाही. त्यामुळे न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभी करता आली. भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. अनिलसारख्या अत्यंत सालस, यशस्वी आणि परिपक्व व्यक्तीने त्यागपत्र दिले. पुढे रवी शास्त्री प्रशिक्षक झाल्यावर त्याचे अन् विराटचे चांगले जुळले. विराटने देशासाठी चांगला खेळ केला; मात्र व्यक्ती म्हणून विराटची अपरिपक्वता अनेक प्रसंगांतून दिसत होती. विराटने ‘इंडियन प्रिमियर लीग’मध्ये १५ वर्षे बेंगळुरू संघाचे नेतृत्व केले; मात्र त्याला कधीही चषक जिंकता आला नाही. याचे कारणही त्याच्या या अहंकाराच्या विविध अभिव्यक्तींमध्ये दडले आहे. सौरभ गांगुली भारतीय संघप्रशिक्षक झाल्यावर त्याच्याशी विराटचे बिनसले. विराटचे काही सहखेळाडू, अन्य संघातील खेळाडू, वरिष्ठ खेळाडू आदींशीही खटके उडत होते. अनिल कुंबळे यांच्याप्रमाणे सौरभ विराटच्या वर्चस्वाला बधला नाही. त्याने विराटचे कर्णधारपद काढून घेतले. रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करायला सिद्ध नव्हता. सौरभने रोहितला नेतृत्वाचे महत्त्व सांगून ते करण्यास भाग पाडले. पुढे राहुल द्रविड हा अत्यंत उत्कृष्ट जिगरबाज खेळाडू आणि संयमी, सभ्य गृहस्थ प्रशिक्षक म्हणून भारतीय क्रिकेट संघाला मिळाला. ‘कर्णधार कसा असावा’, हे विराटचाच सहकारी रोहित शर्मा याने कृतीतून २९ जून २०२४ या दिवशी आणि गेल्या २ वर्षांत दाखवून दिले. माणूस म्हणून सर्वांना सोबत घेऊन जाणारा रोहित शर्मा आणि आदर्श खेळाडू राहुल द्रविड यांची युती यशस्वी झाली. या दोघांनी ३ वर्षांतच भारताला सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये अग्रस्थानी आणले.

३. अहंकाराचा फुगा फुटला की विजय आपलाच !

विराटच्या वरील वक्तव्यावरून तो गेले काही मास कोणत्या मानसिकतेतून प्रवास करत होता, याची कल्पना येते. वैयक्तिक स्तरावर शारीरिक चपळता (फिटनेस), कौशल्य, चिकाटी, खेळात स्वतःला झोकून देणे, धावांची भूक इत्यादींच्या संदर्भात विराट जगात पुढे होता; मात्र अहंकाराचा फुगा फोडण्यासाठी त्याला कारकीर्दीच्या शेवटाची वाट पहावी लागली. ‘विराट आता अंतर्मुख होत आहे, ईश्वरासमोर नतमस्तक होत आहे’, हे त्याच्या वरील विधानांतून लक्षात येते. एवढ्या मोठ्या यशानंतरही मोकळेपणे स्वतःतील कमतरतेचे विश्लेषण सर्वांसमोर मांडल्याविषयी विराटचे कौतुक करावे, तितके अल्पच आहे. त्याचे हे विश्लेषण, त्याची निर्मळता हीच त्याच्यातील मोठेपणाचे आणि परिपक्वतेचे दर्शन घडवते ! अशा अनेक गुणांमुळेच त्याला ‘किंग कोहली’ (क्रिकेटचा राजा) असेही म्हटले जाते ! खेळ असो, व्यवहार असो वा अध्यात्म, अहंकाराचा फुगा फुटल्याविना अंतर्विजयाचा म्हणजे आनंदाचा चषक मिळत नाही, हेच या विश्वचषकाने सर्वांना शिकवले ! (३०.६.२०२४)

– श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.