मुंबई, ४ जुलै (वार्ता.) – ‘सिडको आणि राज्य सरकार यांच्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांचे दलाल, भ्रष्ट अधिकारी बसले आहेत. राज्य सरकारचे अनेक अधिकारी भ्रष्ट आहेत. सरकारमध्येही अनेकांचे हात स्वच्छ नाहीत’, असे विधान भाजपचे आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत मांडले. ‘मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला ५ पैशांची किंमत नाही का ? तसे असेल, तर सांगा. आम्ही लोकांमध्ये गेल्यावर त्यांना हेच सांगू’, अशा कठोर शब्दांमध्ये नाईक यांनी आपल्याच सरकारला प्रश्न विचारले. नवी मुंबई महानगरपालिका प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर त्याविषयी संबंधित अधिकार्यांची कोणतीही बैठक झाली नसल्याविषयीची लक्षवेधी त्यांनी मांडली होती. त्या वेळी ते बोलत होते.