मुंबईला अदानींपासून वाचवा ! – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

  • भूमी घशात घालणार्‍या चोरांची चौकशी करा !

  • सरकारकडून माहिती न दिल्याने विरोधकांचा सभात्याग !

मुंबई, ४ जुलै (वार्ता.) – मुंबई राजरोसपणे लुटली जात आहे. दुग्ध विकास विभागाची साडे आठ हेक्टर जागा उद्योगपती अदानी यांच्या घशात घातली आहे. त्यामुळे मुंबईला उद्योगपती अदानी यांच्यापासून वाचवा, असे आवाहन करत भूमी घशात घालणार्‍या चोरांची चौकशी करण्याची मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. अदानी पूर्ण मुंबई साफ करत आहेत. अदानी यांना राज्याचे प्रमुख पाठीशी घालत आहेत का ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ४ जुलै या दिवशी मुंबई येथील भूमी हस्तांतरणाचे सूत्र स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केले. सभागृहाला याविषयी माहिती देण्याची मागणी त्यांनी केली; मात्र सभागृहात मंत्र्यांकडून माहिती न मिळाल्याने वडेट्टीवारांसह विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालून सभात्याग केला.