महाराष्‍ट्रात प्रत्‍येक सोमवारी आणि शुक्रवारी प्रत्‍येक आगारात साजरा होणार ‘प्रवासी राजादिन !’

  • १५ जुलैपासून प्रारंभ !

  • प्रवाशांच्‍या समस्‍या, तक्रारी आणि सूचना यांचे जलद गतीने निराकरण होणार !


मुंबई, ४ जुलै (वार्ता.) – प्रवाशांच्‍या समस्‍या, तक्रारीवजा सूचना यांचे स्‍थानिक पातळीवर जलदगतीने निराकरण होण्‍याच्‍या उद्देशाने प्रत्‍येक आगारात (डेपोमध्‍ये) प्रति सोमवारी आणि शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत ‘प्रवासी राजादिन’ आयोजित करण्‍यात येणार आहे. ‘या दिवशी ‘एस्.टी.’चे जिल्‍हाप्रमुख म्‍हणजे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्‍या समस्‍या, तक्रारी, सूचना ऐकून घेतील. त्‍या तातडीने सोडवण्‍याच्‍या दृष्‍टीने उपाययोजना करतील. त्‍यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता वाढण्‍यास साहाय्‍य होईल’, असे मत एस्.टी. महामंडळाचे उपाध्‍यक्ष आणि व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी व्‍यक्‍त केले आहे.

१. ही अभिनव योजना १५ जुलैपासून चालू होणार आहे. प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये यांनी समस्‍या-तक्रारी, सूचना लेखी स्‍वरूपात देऊ शकतात. त्‍यावर विभाग नियंत्रक तातडीने कार्यवाही करतील.

२. ‘प्रवासी राजादिन’ कोणत्‍या दिवशी कोणत्‍या आगारात होणार आहे, याचे वेळापत्रक विभाग नियंत्रक त्‍या त्‍या वेळी घोषित करतील. विशेष म्‍हणजे प्रत्‍येक लेखी तक्रारीची नोंद ठेवण्‍यात येणार असून याविषयी काय कार्यवाही केली आहे, यावर मध्‍यवर्ती कार्यालय लक्ष ठेवणार आहे.

प्रवाशांनी योजनेचा लाभ घेण्‍याचे आवाहन

‘एस्.टी.’च्‍या विविध बसगाड्यांमधून प्रतिदिन ५४ ते ५५ लाख प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली जाते. प्रवाशांना ‘एस्.टी. बसस्‍थानक, बसस्‍थानकांवरील प्रसाधनगृहे स्‍वच्‍छ, निर्जंतुक आणि टापटीप असावीत’, असे वाटते, तसेच एस्.टी. बसगाड्या स्‍वच्‍छ आणि वेळापत्रकानुसार वेळेत मार्गस्‍थ व्‍हाव्‍यात.

‘ठरलेले थांबे घ्‍यावेत, चालक-वाहक यांनी त्‍यांच्‍याशी सौजन्‍याने वागावे’, अशी किमान अपेक्षा प्रवाशांकडून व्‍यक्‍त केली जाते. तक्रारींचे वेळेत निराकरण न झाल्‍यास प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. या समस्‍यांचे निराकरण स्‍थानिक पातळीवर तातडीने होऊ शकते. तरी सर्व प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्‍या समस्‍यांचे निराकरण करून घ्‍यावे, असे आवाहन डॉ. माधव कुसेकर यांनी केले आहे.