‘श्री. चैतन्य तागडे ‘साधना सत्संग समन्वयक’ म्हणून सेवा करत होते. तेव्हा मला एक वर्ष चैतन्यदादांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली. त्या कालावधीत मला दादांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. प्रेमभाव
चैतन्यदादांच्या बोलण्यात पुष्कळ आपलेपणा असतो. ते नेहमी सहजतेने बोलतात आणि आपुलकीने सर्वांची विचारपूस करतात.
२. साधकांना आधार देणे
अ. मी या सेवेला आरंभ केल्यावर मला सेवेतील अनेक गोष्टी लक्षात येत नव्हत्या. मला दादांना त्याविषयी पुनःपुन्हा विचारावे लागत असे; मात्र दादांनी कधीच ‘त्यांना वेळ नाही’, असे सांगितले नाही. मला नेहमी त्यांचा आधार वाटतो.
आ. ते माझे बोलणे पूर्ण ऐकून घेऊन नंतर त्यावर दृष्टीकोन देतात. ‘त्यांनी कधी घाईत बोलणे संपवले आहे’, असे मला जाणवले नाही. मला त्यांच्याशी मोकळेपणाने बोलता येते.
३. साधकांना प्रोत्साहन देणे
मी प्रथमच या सेवेत सहभागी झाले असतांना दादांनी वेळोवेळी मला पुढाकार घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे मला सेवेचे दायित्व घेतांना कोणताही ताण आला नाही.
आपण एखादी सेवा हस्तांतर करत असतांना आपल्या मनात ‘समोरच्या साधकाला ते जमेल का ? त्याला समजेल का ? तो माझ्यासारखी ती सेवा करू शकेल का ?’, असे विचार असतात; मात्र दादांच्या संदर्भात मला तसे जाणवले नाही. ते करत असलेली संहिता व्यवस्थापनाची सेवा त्यांनी मला हस्तांतर केली. तेव्हा त्यांच्यामध्ये सहजता आणि आत्मविश्वास होता की, ‘तिला ती सेवा जमेल.’ त्यामुळे मी आत्मविश्वासाने ती सेवा करू शकले. ‘अन्य साधकांकडून सेवा करून घेतांना किंवा अन्य साधकांना एखाद्या सेवेचे दायित्व देतांना सेवा कशी दिली पाहिजे’, हे मला दादांकडून शिकायला मिळाले.
४. शिकण्याची वृत्ती
‘उत्तरदायी साधकांच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असे सांगतात. उत्तरदायी साधकांनी एखादे सूत्र सांगितल्यावर चैतन्यदादांचा ‘गुरुतत्त्वाकडून हे सूत्र आले आहे’, असा भाव असतो. दादा नेहमी उत्तरदायी साधकांकडून शिकण्याच्या स्थितीत असतात. ते प्रत्येक गोष्ट विचारून करतात. त्यामुळे ‘विचारून करणे आणि उत्तरदायी साधकांकडून शिकणे’, या गोष्टी मला कृतीत आणता आल्या.
५. गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा करण्याचा ध्यास
दादांच्या नावाप्रमाणे त्यांच्या वाणीत चैतन्य जाणवते. ते सतत शरणागतभावात असतात. ते सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. ते सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असतात. ते ‘गुरुदेवांना काय अपेक्षित आहे ?’, याचा विचार प्रथम करतात. ‘एखाद्या प्रसंगाकडे आध्यात्मिक दृष्टीकोनातून कसे पहावे ?’, हे मला दादांकडून शिकायला मिळते. ‘उत्तरदायी साधकांमध्ये जे गुण आवश्यक आहेत, ते सर्व चैतन्यदादांमध्ये आहेत’, असे मला जाणवते.
६. सद्गुरु आणि संत यांच्या प्रती भाव
दादा सत्संगात साधनेविषयी सूत्रे सांगतात. दादा आम्हाला ते संतांच्या सहवासात असतांना त्यांनी अनुभवलेली सूत्रे, त्यांना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी केलेले निरीक्षण सांगतात. दादांच्या बोलण्यातून संतांप्रती पुष्कळ भाव जाणवतो आणि त्यांचे बोलणे ऐकून साधकांचाही भाव जागृत होतो.
७. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच जीवनाचा केंद्रबिंदू असणे
दादांचे दृष्टीकोन सहज आणि स्पष्ट असतात. दादांच्या बोलण्याचा केंद्रबिंदू नेहमीच सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव असतात. दादांनी सांगितलेले दृष्टीकोन लगेच माझ्या अंतर्मनापर्यंत पोचतात आणि माझ्या मनाची अस्वस्थता किंवा मला असणारा सेवेचा ताण न्यून होतो. ‘माझ्यासारख्या दगडाला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी घडवले आहे’, असे दादा नेहमी म्हणतात.
‘गुरुदेवा, आपल्यावर दृढ श्रद्धा असलेल्या चैतन्यदादांच्या समवेत सेवा करण्याची संधी मला मिळाली’, याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे. मलाही ‘त्यांच्यासारखे दायित्व घेऊन सेवा करता येऊ दे’, अशी मी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’
– सौ. दीपा औंधकर, रत्नागिरी (२०.६.२०२४)