७० वर्षे अथक परिश्रम करून ‘नामसंकीर्तनयोगा’विषयी मिळवलेले अमूल्य ज्ञान महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला समर्पित करणार्‍या चेन्नई येथील पू. (श्रीमती) कांतीमती संतानम् (वय ८६ वर्षे) !

चेन्नई येथील पू. (श्रीमती) कांतीमती संतानम् ८६ वर्षांच्या आहेत आणि वयोमानानुसार त्यांना अनेक आजारही आहेत; मात्र नामसंकीर्तनाच्या माध्यमातून त्यांची देवाची भक्ती तसूभरही उणावलेली नाही. ‘नामसंकीर्तनयोग’ ही ‘नादोपासना’ आहे. ‘विविध संतांनी रचलेली भक्तीगीते ईश्वरचरणी अर्पण करणे’, म्हणजेच नादोपासना होय. या वयातही त्या मानधन न घेता विविध मंदिरांमध्ये ‘नामसंकीर्तना’चे कार्यक्रम करत आहेत. त्या २ वर्षांच्या असल्यापासून त्यांच्या वडिलांच्या समवेत नामसंकीर्तन करत आहेत. त्यांचे वडील हे त्यांचे पहिले गुरु होते. ७० वर्षे नामसंकीर्तनयोगाद्वारे मिळवलेले अगाध ज्ञान त्यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. उतारवय आणि आजारपण असतांनाही त्यांनी ‘नामसंकीर्तनाचे महत्त्व अन् त्याचे लाभ’, याविषयी तमिळ भाषेत लिखाण करून ते महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला अर्पण केले आहे.

पू. (श्रीमती) कांतीमती संतानम्

१. कर्नाटक संगीताविषयी अगाध ज्ञान असणे

पू. कांतीमतीमामी यांना कर्नाटक संगीताचे अगाध ज्ञान आहे. त्यामुळे त्यांनी स्वतः अनेक नामावली लिहिल्या आहेत. त्यांनी अनेक भजने विविध रागांमध्ये संगीतबद्ध केली आहेत. त्यांतील काही राग दुर्मिळ आहेत.

(पू.) सौ. उमा रविचंद्रन्

२. अनेक भाषा अवगत असणे आणि संतांच्या भजनांचा भाव अन् अर्थ ठाऊक असणे

पू. कांतीमतीमामी यांना अनेक भाषा अवगत आहेत. त्या अनेक भाषांमधील भजने अस्खलितपणे गाऊ शकतात. त्यांचे वैशिष्ट्य हे आहे की, ‘संतांच्या एखाद्या भजनाचा आंतरिक भाव आणि त्याचा अर्थ काय आहे ? कोणत्या प्रसंगात ते भजन गायले होते ?’, हे त्या सविस्तरपणे सांगू शकतात.

३. ‘नामसंकीर्तना’साठी इतरांना प्रोत्साहन देणे

पू. कांतीमतीमामी ‘नामसंकीर्तना’ची प्रशंसा करतात. त्यात सहभागी होण्यासाठी त्या इतरांनाही प्रोत्साहित करतात. इतरांसाठी त्या प्रेरणादायी आहेत.

४. संगीताप्रतीचा समर्पणभाव

पू. कांतीमतीमामी प्रतिदिन पहाटे ३ वाजता उठून ‘नामसंकीर्तना’विषयी लिखाण करतात. यावरून त्यांचा संगीताप्रतीचा समर्पणभाव प्रकर्षाने जाणवतो.’

– (पू.) सौ. उमा रविचंद्रन् (सनातनच्या ७० व्या संत, वय ५८ वर्षे), चेन्नई (जून २०२४)