अकोला येथील अधिवक्त्यांचा सनातनच्या कार्याला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद

‘धर्मकार्य करतांना अधिवक्त्यांची (वकिलांची) आवश्यकता लागू शकते; म्हणून न्यायालयीन प्रक्रियांची ओळख करून घ्यावी आणि ‘धर्मप्रेमी अधिवक्ते शोधून त्यांच्याशी संपर्क करता यावा’, हाच ‘अधिवक्ता सनद’ (वकिली सनद) घेण्यामागे माझा उद्देश होता. त्यासाठी मी वयाच्या ४४ व्या वर्षी विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि ४७ व्या वर्षी म्हणजे वर्ष २००९ मध्ये ‘अधिवक्ता सनद’ घेतली. वर्ष २०१२ पासून मी अकोला जिल्हा न्यायालयात अधिवक्ता म्हणून जाण्यास प्रारंभ केला. काही अधिवक्यांना सनातनचे कार्य पटल्यानंतर त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याविषयी येथे दिले आहे.   

अधिवक्त्या (श्रीमती) श्रुती भट

१. हिंदु धर्मावर होणार्‍या आक्रमणांविषयी वैध मार्गाने विरोध करण्याचे महत्त्व अधिवक्त्यांना सांगितल्यावर त्यातील काही जण सनातनच्या कार्यात सहभागी होणे

‘माझे प्रयत्न त्या दृष्टीने चालू झाले. यामध्ये ‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकांचे वितरण करणे, सात्त्विक उत्पादने आणि सनातन पंचांग वितरित करणे, ‘कुलदेवता’ आणि ‘दत्त’ यांच्या नामजपाचे महत्त्व सांगणे, हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर होणार्‍या आक्रमणांविषयी त्यांची संवेदनशीलता जागृत करून ती अधिक तीव्र करणे, त्यांना वैध मार्गाने विरोध करण्याचे महत्त्व सांगणे’, असे प्रयत्न मी चालू केले. त्यामुळे वर्ष २०२२ पर्यंत साधारण ३०० अधिवक्त्यांना सनातनचे कार्य ठाऊक झाले. त्यांच्यातील काही जणांना ते पटले आणि ते सनातनच्या कार्यात सहभागी होऊ लागले.

२. अधिवक्त्यांचा सनातनच्या कार्यावर असलेला विश्वास !

काही प्रसंगी एखाद्या निवेदनावर प्राधान्याने अधिवक्त्यांच्या स्वाक्षर्‍या घेण्यासाठी मी त्यांच्याकडे गेले, तर अपवादाने एखादाच अधिवक्ता विषय पूर्ण वाचतो. बाकी सर्वजण म्हणतात, ‘‘सनातनचा विषय आहे ना ?; म्हणजे चांगलाच असेल. वाचण्याची काही आवश्यकता नाही.’’ अधिवक्ता निवेदनावर लगेचच स्वाक्षरी देतात. त्यांचा सनातनच्या कार्यावर विश्वास निर्माण झाला आहे. अशा प्रसंगी ईश्वराविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटते.

३. अधिवक्ते सनातनच्या उपक्रमांमध्ये सहभागी होणे आणि काही जण गोवा येथील वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी नियमितपणे येणे

हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र धर्म विरोधी आंदोलनात सहभागी होणे, जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देणे, प्रसंगी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार करणे इत्यादी उपक्रमांमध्ये सहभागी होतात. हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर हेसुद्धा अधिवक्त्यांना भेटतात. तसेच पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे (समष्टी) संत) यांचाही काही वेळा अधिवक्त्यांना सत्संग लाभतो. ४ वर्षांपासून त्यांच्यातील काही जण गोवा येथील वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी नियमितपणे येत आहेत.

 ४. ‘साधना करून स्थिरता येते’, हे लक्षात आल्यावर एका महिला अधिवक्त्याने साधना करण्यास प्रारंभ करणे

माझे यजमान (कै. श्रीकांत भट) यांचे निधन झाल्यावर ईश्वराच्या कृपेमुळे मला स्थिर आणि तणावरहित रहाता आले. एका महिला अधिवक्त्याचे यजमान आजारी झाल्यावर त्यांना पुष्कळ ताण आला होता. त्या मला म्हणाल्या, ‘‘तुमच्याकडे पाहून मलाही साधना करावी आणि सत्संगात यावे’’, असे तीव्रतेने वाटू लागले आहे. एकदा सद्गुरु स्वाती खाडये अकोला येथे आल्या होत्या. त्यांच्या सत्संगाला त्या महिला अधिवक्त्या उपस्थित राहिल्या. आता त्यांनीही नामजप करण्यास प्रारंभ केला आहे.

५. प्रार्थना आणि कृतज्ञता

‘श्री गुरूंच्या कृपेमुळे ‘अधिवक्ते मला नेहमी सकारात्मक प्रतिसाद देतात’, अशी माझी दृढ श्रद्धा आहे. सर्व सेवा श्री गुरुचरणी अर्पण करते आणि ‘त्यांनी माझ्याकडून अधिकाधिक सेवा करून घ्यावी’, अशी मी त्यांच्या श्री चरणी प्रार्थना करते.’ ‘न्यायालयासारख्या अत्यंत रज-तमात्मक वातावरणात राहून श्री गुरु माझ्याकडून सेवा करून घेतात. समाजातील अधिवक्ते मला व्यावसायिक अधिवक्त्या म्हणून न ओळखता सनातनच्या ‘सेवाभावी धर्मप्रेमी अधिवक्त्या’ म्हणून ओळखतात’, त्याबद्दल गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– अधिवक्त्या श्रुती भट (वय ६१ वर्षे), अकोला (२५.६.२०२४)