Indian App ‘Koo’ Shuts Down : ‘एक्स’शी स्पर्धा करण्यासाठी निर्मिलेले ‘कू’ हे भारतीय अ‍ॅप झाले बंद !

भांडवलाच्या अभावी, तसेच अन्य आस्थापनांशी वाटाघाटी अपयशी ठरल्याने आस्थापनाच्या प्रमुखांना घ्यावा लागला टोकाचा निर्णय !

नवी देहली – विदेशी सामाजिक माध्यम ‘एक्स’ला (तत्कालीन ट्विटरला) शह देण्यासाठी ‘कू’ नावाचे अ‍ॅप चालू करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये भाजपनेही या अ‍ॅपला प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे लक्षावधी राष्ट्रनिष्ठ भारतियांनी या अ‍ॅपचा वापर चालू केला; परंतु जागतिक स्तरावर वर्चस्व असलेल्या ‘एक्स’ला शह देण्यासाठी आवश्यक भांडवल अल्प पडल्याने, तसेच अन्य मोठ्या आस्थापनांमध्ये विलीनीकरण करण्याच्या वाटाघाटी अपयशी ठरल्याने ‘कू’ अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. ३ जुलै या दिवशी kooapp.com या सामाजिक माध्यमाच्या लिंकवर आस्थापनाच्या मालकांनी अ‍ॅप बंद करत असल्याचे निवेदन प्रसारित केले आहे.

‘कू’ अ‍ॅपच ट्विटरचा एकमेव प्रतिस्पर्धी !

‘कू’ अ‍ॅपचे सहसंस्थापक अप्रमेय आणि मयांक यांनी प्रसारित केलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, लोकांना त्यांच्या मूळ भाषेच्या आधारे एकत्र आणण्याच्या उद्देशाने आम्ही ‘कू’ चालू केले. बहुतेक जागतिक उत्पादने इंग्रजीवर लक्ष केंद्रित करतात; परंतु जगातील ८० टक्के लोक इंग्रजीव्यतिरिक्त १ सहस्र भाषा बोलतात. आम्हाला या वापरकर्त्यांना एकमेकांशी अधिक अर्थपूर्ण मार्गाने जोडण्यात आणि विचारांची देवाणघेवाण करण्यात साहाय्य करायचे होते. आम्ही ४ वर्षांपूर्वी मार्च २०२० मध्ये कोरोना दळणवळण बंदीपूर्वी ‘कू’ चालू केले. गेल्या ४ वर्षांत ‘कू’ला जनता, निर्माते, जगभरातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि प्रसारमाध्यमे यांच्याकडून पुष्कळ प्रेम मिळाले.

हे अ‍ॅप ‘ट्विटर’चा एकमेव प्रतिस्पर्धी होते. या अ‍ॅपला ६ कोटी डाऊनलोड, ८ सहस्र अतीमहनीय खाती, तसेच १०० प्रकाशक खाती लाभली होती. या सामाजिक माध्यमाला नियमितपणे चालू ठेवण्यासाठी आवश्यक भांडवल उभारण्यासाठी आम्ही गेली २ वर्षे पुष्कळ प्रयत्न केले, परंतु त्याला यश येऊ शकले नाही. त्यामुळे ‘कू’च्या लक्षावधी वापरकर्त्यांचे आम्ही आभारी आहोत की, त्यांनी आम्हाला साहाय्य केले; परंतु दु:खी मनाने आम्हाला ‘कू’ बंद करावे लागत आहे.