China Stops Funding CPEC : चीनने ‘सीपीईसी’ प्रकल्पात पाकला वार्‍यावर सोडले !

चीनने पैसे देणे थांबवल्याने ‘सीपीईसी’अंतर्गत महत्त्वाचा ‘मेनलाइन-१’ प्रकल्प रखडला !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – चीनने पाकसमवेतच्या करारामध्ये पैसे देणे बंद केल्यामुळे पाकिस्तान अडचणीत सापडला आहे. पाकच्या शहाबाझ शरीफ सरकारने चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’च्या (‘सीपीईसी’, म्हणजेच चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाच्या) अंतर्गत ६.७ अब्ज डॉलरच्या (५६ सहस्र कोटी रुपयांच्या) महत्त्वाच्या मेनलाइन-१ (एम्.एल्.-१) प्रकल्पाची स्वीकृती पुढे ढकलली आहे.

१. पाकचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आर्थिक परिषदेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. चीनने सीपीईसी प्रकल्पासाठी पैसे देणे बंद केल्यामुळे पाकिस्तानला तो पूर्ण करणे कठीण झाले आहे.

२. तथापि परिषदेच्या बैठकीत चीनने वित्तपुरवठा केलेल्या दोन प्रकल्पांना स्वीकृती देण्यात आली. यांतर्गत ग्वादरमध्ये विमानतळ बांधले जाणार असून एक महत्त्वाचा रस्ता पूर्ण केला जाणार आहे.

३. यापूर्वी अर्थ मंत्रालयाच्या चिंतेला न जुमानता पाकिस्तानच्या आघाडी सरकारने एम्.एल्.-१ प्रकल्पाला स्वीकृती दिली होती.

४. विशेष म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाझ शरीफ यांनी अलीकडेच सीपीईसी प्रकल्पासाठी निधी मिळवण्याच्या उद्देशाने चीनला भेट दिली होती; परंतु त्यांना काहीच साध्य करता आले नाही. याउलट चिनी अधिकार्‍यांनी पाकच्या व्यापक आर्थिक आवश्यकता आणि प्रचंड विदेशी कर्ज, यांमुळे पाकची मर्यादित क्षमता पहाता त्याला ‘एम्.एल्.-१’ रेल्वे प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचा सल्ला दिला.

चीनने खर्च अल्प करण्यास सांगितले !

नियोजन आयोगाच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार चीनने याआधी सीपीईसी प्रकल्पाची किंमत एक तृतीयांश अल्प करून ६.७ अब्ज डॉलर करण्यास सांगितले होते.  यामुळे नियोजन आयोगाने हा प्रकल्प अव्यवहार्य घोषित केला.

संपादकीय भूमिका

स्वार्थांध चीनची ही मनोवृत्ती पाकचे धिंडवडे काढणार, हे जगजाहीर होतेच. चीनवर अवलबूंन असणार्‍या पाकची स्थिती आता कोलमडेल, हे निश्‍चित ! भारतद्वेषापायी चीनला जवळ करणार्‍या पाकला यापेक्षा दुसरी मोठी शिक्षा ती कुठली असेल ?