Hathras Accident : भोले बाबांचा स्पर्श झालेली माती गोळा करतांना झाली चेंगराचेंगरी !

  • हाथरस (उत्तरप्रदेश) येथील घटनेत १२१ जणांचा मृत्यू

  • सत्संगासाठी अडीच लाख भाविक झाले होते जमा !

नारायण साकार विश्‍व हरि उपाख्य भोले बाबा (उजवीकडे)

हाथरस (उत्तरप्रदेश) – येथे नारायण साकार विश्‍व हरि उपाख्य भोले बाबा यांच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १२१ जणांचा मृत्यू झाला. ‘ भोले बाबांनी सत्संगस्थळ सोडल्यानंतर त्यांचा स्पर्श झालेली माती गोळा करण्याकरता गर्दी जमली. त्या वेळी ही चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत भाविक जवळ असलेल्या नाल्यात पडले’, अशी माहिती उत्तरप्रदेशचे सचिव मनोज कुमार सिंह यांनी दिली.

या प्रकरणी पोलिसांनी सत्संगाचे मुख्य स्वयंसेवक देवप्रकाश मधुकर आणि इतर अज्ञातांसह आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यात म्हटले आहे की, आयोजकांनी ८० सहस्र लोकांच्या सत्संगासाठी अनुमती मागितली होती; परंतु या सत्संगाला अडीच लाखांहून अधिक भाविक जमले होते. ‘भोले बाबा यांच्यावर कारवाई केली जाईल’, असे मनोज कुमार सिंह यांनी म्हटले आहे; मात्र नोंदवलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांचे नाव नाही. यामुळे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

कोण आहेत भोले बाबा ?

भोले बाबा यांचे खरे नाव सुरज पाल सिंह आहे. जवळपास ४० वर्षांपूर्वी ते उत्तरप्रदेश पोलिसांत हवालदार म्हणून रुजू झाले होते. १० वर्षे पोलिसांत नोकरी केल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली. १९९० च्या दशकात त्यांनी हाथरसमधील त्यांच्या मालकीच्या भूमीवर मोठा आश्रम बांधला आणि तिथे सत्संगांचे आयोजन करण्यास प्रारंभ केला. आसपासच्या गावांसह इतर राज्यांमधूनही त्यांच्या आश्रमात मोठ्या संख्येने लोक येऊ लागले.

संपादकीय भूमिका

इतक्या मोठ्या संख्येने भाविक जमा होणार, याची माहिती पोलीस आणि प्रशासन यांना कशी मिळाली नाही ? आणि त्यांनी याविषयी योग्य नियोजन का केले नाही ? याला उत्तरदायी असणार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे !