‘मी आणि प्रियांकाताई (कु. प्रियांका लोणे) आम्ही पुण्याहून रामनाथी आश्रमात येत होतो. अनपेक्षितपणे आम्हाला सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांचा सहवास आणि सत्संग लाभला. गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सद्गुरु काकांच्या माध्यमातून आम्हाला अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. या लेखातील काही भाग २ जुलै या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
५. सद्गुरुकाकांनी साधिकेला ‘श्रीविष्णूच्या चरणांशीच आहे’, असा भाव ठेवण्यास सांगणे
सद्गुरुकाकांनी माझ्या एका अडचणीवर अमूल्य असे मार्गदर्शन केले. मी सद्गुरुकाकांना सांगितले, ‘‘गोव्यात असतांना मी नागेशी येथे रहात होते. तेव्हा तेथे मला गुरुदेवांना अनुभवता येत नसल्याने मला ते स्वीकारता येत नव्हते.’’ त्या वेळी काकांनी मला त्यांच्या स्थितीविषयी सांगितले. ते म्हणाले, ‘‘मलाही आरंभीला रामनाथी आश्रमाच्या बाहेर एका निवासस्थानी रहाण्यास सांगितले होते. त्या वेळी मला अन्य साधकांद्वारे कळले होते की, ‘गुरुदेवांची सकारात्मक प्रभावळ (Positive Aura) ६ कि.मी. पर्यंत आहे. मी तर आश्रमापासून ३ कि.मी. अंतरावरच रहात आहे. तेव्हा ‘मी गुरुदेवांच्या चरणांशी आहेच’, असा मी भाव ठेवला.’’ तसे नागेशी, म्हणजे श्रीविष्णूच्या शेषनागाची शेषशय्याच आहे. तिचा आरंभ रामनाथी आश्रमाच्या लागवडीपासून नागेशीपर्यंत होतो. तर मग तू ‘श्रीविष्णूच्या चरणांशीच आहे’, असा भाव ठेवायला हवा.’’
६. सद्गुरुकाकांनी गुरुदेवांना भेटण्यास जातांना सुदामा आणि शबरी यांच्याप्रमाणे भाव ठेवण्यास सांगणे
सद्गुरु काका आम्हाला म्हणाले, ‘‘आता तुम्ही गुरुदेवांना भेटायला जाल, तेव्हा तुम्ही ‘सुदामा साक्षात् कृष्णाकडे जात आहे’, असा भाव ठेवायला हवा. आपल्या घरी संत आणि सद्गुरु येतात, तेव्हा ज्याप्रमाणे माता शबरी श्रीरामाची वाट पहायची, तेव्हाची तिची व्याकुळता आणि तिच्यासारखा आर्तभाव आपणही ठेवू शकतो.’’
७. एकत्रित प्रवासात सद्गुरुकाकांचा पांडुरंगाच्या वारीप्रमाणे वारी करत परात्पर गुरुदेवांना भेटायला जात असल्याचा भाव असणे
त्यानंतर महाप्रसाद घेतांना मी सद्गुरु काकांसमवेत होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या डब्यातील प्रसाद आम्हा सर्वांच्या ताटलीमध्ये वाढला. आम्ही आणलेला भात थोडा तिखट होता. त्यामुळे मी सद्गुरुकाकांना विचारले, ‘‘काका, तुम्हाला भात वाढू का ? थोडा तिखट आहे.’’ सद्गुरु पिंगळेकाकांनी ‘‘हो वाढ. थोडा चालेल’’, असे सांगितले. ते आनंददायी क्षण अनुभवतांना सद्गुरुकाका म्हणाले, ‘‘जसे पांडुरंगाचे भक्त पांडुरंगाला भेटायला पायी वारी करतात, तसेच आपणही सर्व साधक गुरुमाऊलींना भेटण्यासाठी ही वारी करत आहोत’, असेच वाटते.’’
८. सद्गुरुकाकांनी‘वारी’चा अर्थ सांगून ही वारी याच जन्मात पूर्ण करायची असल्याचे सांगणे
सद्गुरु काकांनी आम्हाला ‘वारी’चा दुसरा अर्थ सांगितला. ते म्हणाले, ‘‘श्री दुर्गादेवीच्या आरतीत एक ओळ आहे. ‘वारी वारी जन्म-मरणाते वारी ।’ म्हणजे ‘मनुष्याचा वारंवार होणारा मनुष्यदेहातील जन्म आणि त्याचा मोक्षापर्यंत जाण्याचा प्रवास, म्हणजे एक ‘वारी’ आहे.
देवाने आपल्याला मनुष्य देहात पाठवले आहे, म्हणजेच आपण ‘परदेशात’ आलो आहोत. आपल्याला ‘स्वदेशात’, म्हणजे गुरुमाऊली समवेतच मोक्षाला जायचे आहे. नारायणाशी एकरूप व्हायचे आहे. ही वारी आपल्याला याच जन्मात मोक्षाला जाऊन पूर्ण करायची आहे.’’
९. सद्गुरु पिंगळेकाकांच्या मार्गदर्शनामुळे आमचा प्रवास ‘आध्यात्मिक स्तरावरील साधनाप्रवास’ झाल्यासारखे वाटणे
या सर्व सत्संगांतून ‘सद्गुरु पिंगळेकाका, म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर आहेत’, याची प्रचीती आम्हाला आली. तसेच ‘सद्गुरु काका साधनारूपी ‘ज्ञानमूर्तीच’ आहेत’, असे आम्हाला वाटले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे ‘आमचा हा प्रवास खरोखर आध्यात्मिक स्तरावरील साधनाप्रवास झाला’, असे मला वाटले.
‘गुरुमाऊलींनी सद्गुरुकाकांचा सत्संग देऊन आम्हाला अमूल्य भावभेट दिली’, यासाठी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! गुरुदेवांनी आम्हाला सद्गुरु पिंगळेकाकांची प्रीती, सहजता, प्रत्येक स्थितीतील भाव अशा अनेक पैलूंचे दर्शन घडवले, त्याविषयी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता !’
– कु. प्रतिमा लोणे, सांगवी, पुणे. (३१.७.२०२३)