चंद्रभागा नदीजवळ वारकर्यांसाठी असलेल्या पाण्याच्या टाकीच्या परिसरात असलेली अस्वच्छता आणि कचरा
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली चंद्रभागा नदी आणि नदीचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाकडून अपेक्षित असे प्रयत्न होतांना दिसत नाहीत. चंद्रभागेच्या तीरावर वारकर्यांना पिण्यासाठी हौद ठेवले असून त्यांना हात धुण्यासाठी, तसेच ताटे धुण्यासाठी अन्य एक हौद ठेवण्यात आला होता. ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहरांनी नुकतीच नदीकाठाची पहाणी केल्यावर वारकर्यांना ताटे धुण्यासाठी असलेल्या हौदात शेवाळ असल्याचे, तसेच त्या हौदात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या आढळून आल्या. याविषयी तेथील स्वयंसेवकांना माहिती दिल्यावर त्यांनी तात्काळ याची नोंद घेऊन हौदातील पाणी लगेच सोडून दिले. येथे वारकर्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ठेवलेला हौदही स्वच्छ नव्हता, तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होती. सहस्रो वारकरी ज्या श्रद्धेने चंद्रभागेच्या तीरावर ‘पवित्र तीर्थ’ या भावनेने येतात, त्या परिसरात स्वच्छता असणे अत्यंत आवश्यक आहे. या अस्वच्छतेमुळे वारकर्यांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते.
चंद्रभागा नदीच्या काठावर उसाच्या रसाची दुकाने, छायाचित्रे काढणे, खाद्यपदार्थ, भिकारी, तसेच अनेकांचे अतिक्रमण झालेले आढळून आले. यामुळेही नदीकाठ अस्वच्छ होतो; मात्र या संदर्भात नगरपालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसले.
पंढरपूरच्या विकासासाठी ७३ कोटी रुपयांची कामे चालू आहेत, तर चंद्रभागा शुद्धीकरणासाठी म्हणजेच ‘नमामि चंद्रभागा’ प्रकल्पासाठी ९९५ कोटी रुपयांची कामासाठी संमती मिळाली आहे. सरकारकडून रकमा संमत झाल्या, तरी प्रशासनाला पंढरपूरविषयी पूरेपूर आस्था असल्याविना तेथील पावित्र्य ठिकवण्यासाठीचे प्रयत्न अल्पच पडतील. त्यामुळे चंद्रभागा नदीचे पावित्र्य टिकवण्यासाठी प्रशासकीय प्रयत्नांची नितांत आवश्यकता आहे. तसेच या अस्वच्छतेला आणि गलथान कारभाराला उत्तरदायी असणार्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे, तरच येथे येऊन लोकांना वारीचे समाधान लाभेल !