विश्वबंधुत्वाचा संकल्प करून आनंदवारीत सहभागी होण्यातच सध्याच्या पिढीचे हित !

सामाजिक प्रसारमाध्यमे आणि दूरचित्रवाणीवरील काही अहवालांच्या माध्यमातून वारी जनसामान्यांपर्यंत पोचते, ती एक ‘इव्हेंट’ म्हणून ! लोक कसे ऊन-पावसात चालतात ? ‘पाऊले चालती पंढरीची वाट’, इत्यादी उत्सवी स्वरूपाची गाणी लावून हा सोहळा ‘कव्हर’ करण्याचा सर्वच माध्यमांचा प्रयत्न असतो. वारीच्या मागची तात्विक बैठक समजून घेण्याचा प्रयत्न क्वचित्च होतांना दिसतो.

आजच्या व्यसनाधीनतेच्या आणि मनःस्वास्थ्य बिघडलेल्या जगात पंढरीची वारी मोठा संदेश देते. अनेक उच्च विद्याविभूषित आणि चिंतनशील लोकांचा ओढा हल्ली पंढरीच्या वारीकडे लागला आहे. ‘झिंग झिंग झिंगाट’, आदी गाण्याच्या ठेक्यावर बेधुंदपणे व्यसनाधीन होऊन नाचणार्‍या आधुनिक पिढीला ‘ज्ञानोबा, तुकारामांची आर्त साद गुणगुणावी वाटेल, तेव्हा सामाजिक पालट जाणवेल. प्रतीके स्वीकारून आणि विचार हरवून गेलेल्या आजच्या पिढीला वारी हा एक ‘इव्हेंट’ आहे, असे वाटते.