‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’चा वरिष्ठ कमांडर मौलवी मन्सूर याचा गौप्यस्फोट !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमधील चीनचे प्रकल्प आणि तेथील नागरिकांवर होत असलेली आक्रमणे यांसंदर्भात मोठा खुलासा झाला आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आणि तिचे नेते यांचा हवाला देत ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या आतंकवादी संघटनेचा वरिष्ठ कमांडर नसरुल्ला उपाख्य मौलवी मन्सूर याने हा गौप्यस्फोट करतांना म्हटले की, पाकमध्ये आतंकवादी घटना घडवून आणण्यासह टीटीपी आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बी.एल्.ए.) या दोन आतंकवादी संघटनांनी चिनी नागरिकांवर आक्रमणे करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. टीटीपीला भारतीय गुप्तचर संस्थेकडून ना पैसा मिळतो ना शस्त्रे. आम्ही आमची लढाई स्वतः लढत आहोत.
१. पाकिस्तानी सैन्याने नुकतेच मौलवी मन्सूर याला बलुचिस्तानमधून अटक केली. पाकिस्तानी सैन्यानुसार टीटीपी आणि बी.एल्.ए. दोघे मिळून अपहरणाची योजना आखतात अन् ओलिसांना अफगाणिस्तानात पाठवल्यानंतर त्यांना बेपत्ता घोषित केले जाते.
२. चिनी नागरिकांवर झालेल्या आक्रमणांत पाकने पोसलेल्या आतंकवादी संघटनांची नावे समोर येताच शहाबाझ शरीफ आणि त्यांच्या सरकारने स्वतःचे दायित्व झटकून प्रत्येक वेळी भारतावर बिनबुडाचे आरोप केले. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या आतंकवादी संघटनांना भारत निधी पुरवतो, असा दावा बलुचिस्तानचे गृहमंत्री झियाउल्ला लंगाऊ यांनी केला होता.
३. एकट्या वर्ष २०२४ च्या पहिल्या चार महिन्यांत आतंकवादी आक्रमणांत २८१ नागरिक आणि सुरक्षा दलाचे सैनिक मारले गेले आहेत. यासंदर्भात चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही पाकचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांना थेट इशारा दिला असून जोपर्यंत पाकिस्तानमध्ये स्थैर्य येत नाही, तोपर्यंत चीन ५० लाख रुपयेही देणार नसल्याचे सांगितले आहे.
संपादकीय भूमिकापाकिस्तानात चिनी अभियंत्यांवर सातत्याने होत असलेल्या आक्रमणांमागे भारत असल्याची आवई उठवणारा पाकिस्तान आता या वक्तव्यामागेही भारतच असल्याचे म्हणू लागला, तर आश्चर्य वाटू नये ! |