भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधल्या राख्या !

अर्थसंकल्पात महिलांसाठी भरीव प्रावधान

मुंबई, ३० जून (वार्ता.) – राज्याच्या अर्थसंकल्पात महिला भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याविषयी विविध क्षेत्रांतील महिला भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळले आणि राखी बांधत त्यांचे आभार मानले. या वेळी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची कार्यवाही १ जुलैपासून करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना अनोखी ओवाळणी दिली. या वेळी मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र भोंडेकर आणि विविध क्षेत्रांतील महिला भगिनी उपस्थित होत्या.

विधानभवनाच्या प्रांगणात २९ जून या दिवशी विविध क्षेत्रांतील महिला भगिनी एकत्र जमल्या होत्या. या वेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही घेतलेल्या ‘मुख्यमंत्री माझी बहीण योजने’चा अध्यादेशही तातडीने काढण्याचा निर्णय आम्ही घेतला असून त्याचा लाभ येत्या १ जुलैपासून माता-भगिनींना देण्यात येईल. यानुसार या महिलांना प्रतिमहा १ सहस्र ५०० रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचा लाभ अडीच कोटींहून अधिक महिलांना होणार आहे. महिलांच्या सर्व निर्णयाविषयी महिलांनी आभार मानून राखी बांधल्याविषयी मुख्यमंत्र्यांनी शासनाचे आभार मानले.