बेळगाव येथील परमार्थ निकेतन, अर्चना मोरे पाटील आणि रेश्मा पुणेकर यांना ‘लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई स्मृती’ पुरस्कार घोषित !

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या १२७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

पुणे – ‘श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट’च्या वतीने यंदाचा ‘लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई स्मृती’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. प.पू. श्री कलावतीआईंचे आध्यात्मिक कार्य प्रगतीपथावर नेण्यासाठी अविरत कार्यरत असलेल्या बेळगाव येथील परमार्थ निकेतन संस्था, पत्रकार अर्चना मोरे पाटील आणि खेळाडू रेश्मा पुणेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दत्त महाराजांची प्रतिकृती, २५ सहस्र रुपये सन्मान राशी, महावस्त्र, असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे, अशी घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे यांनी केली. दत्तमंदिराच्या १२७ व्या वर्धापनदिनानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते.

त्यामध्ये पहाटे लघुरुद्र ट्रस्टचे उत्सव उपप्रमुख अक्षय हलवाई यांच्या हस्ते पार पडला, तर प्रात: आरती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्या हस्ते झाली. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष राजू बलकवडे, कार्यकारी विश्वस्त अधिवक्ता प्रताप परदेशी, खजिनदार अधिवक्ता रजनी उकरंडे, महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते. मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त २७ जूनला सकाळी श्री दत्त महाराजांची सालंकृत पूजा करण्यात आली. गरजू आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी दत्त मंदिरासमोरील दत्तभवन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ‘लक्ष्मीबाई आरोग्य मंदिर’ या कायमस्वरूपी रक्तसंकलन आणि पडताळणी केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.