मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रस्थान सोहळ्यास उपस्थित रहाणार !
देहू (जिल्हा पुणे) – आषाढी वारीसाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा २८ जून या दिवशी दुपारी अडीच वाजता देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रस्थान सोहळ्यास उपस्थित रहाणार आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान, देहू नगरपंचायत प्रशासन आणि देहूरोड पोलीस यांनी पालखी प्रस्थान सोहळ्याची सिद्धता केली आहे.
देहूमध्ये पालखी सोहळ्यासाठी राज्यातील सहस्रो वारकरी आणि भाविक आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फुलत आहे. मुख्य देऊळवाड्यात दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी होत आहे. देहूतील विविध संस्था आणि ग्रामस्थ यांच्या वतीने अन्नदानासाठी मंडप उभारण्यात आले असून पालखी मार्गांवर स्वागत कमानीही उभारण्यात आल्या आहेत.
माऊलींच्या पालखी रथ बैलजोडीची मिरवणूक !
आळंदी – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील ‘श्रीं’चा वैभवी पालखी रथ ओढणार्या बैलजोडीची सेवा देण्याचा मान वस्ताद सहादू कुर्हाडे यांना मिळाला आहे. रथ ओढण्यास ‘हौश्या-बाजी’ आणि ‘माऊली-वजीर’ या दोन्ही बैलजोडींची श्री स्वामी महाराज मठ येथून नगरप्रदक्षिणा मार्गे महाद्वार चौक अशी मिरवणूक हरिनामाच्या जयघोषामध्ये काढण्यात आली.
आषाढी वारीनिमित्त कोठी सजली !
आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा २९ जून या दिवशी ‘श्री’ मंदिरातून होणार आहे. या वारीसाठी महिनाभराचे प्रवासातील आवश्यक किराणा साहित्य, मानपानाचे साहित्य, ‘श्रीं’चे वैभवी पालखी सोहळ्यातील लवाजमा साहित्याची जमवाजमव अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती सेवक व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांनी दिली. या कोठीत सुई-दोर्यापासून ‘श्रीं’चे पूजा साहित्य, तसेच सर्व प्रकारच्या साहित्यांनी ‘श्रीं’ची ‘कोठी’ सजली आहे.